वाणसामानासाठी विरारमधील बाजारांत पुन्हा गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2021 12:08 AM2021-04-22T00:08:28+5:302021-04-22T00:08:34+5:30

पालिकेच्या नव्या नियमावलीला फाटा : निर्धारित केलेली सकाळी ७ ते ११ वेळ पडतेय अपुरी?

The markets in Virar are crowded again for goods | वाणसामानासाठी विरारमधील बाजारांत पुन्हा गर्दी

वाणसामानासाठी विरारमधील बाजारांत पुन्हा गर्दी

googlenewsNext



लोकमत न्यूज नेटवर्क 
विरार : कोविड-१९चे वाढते संक्रमण लक्षात घेऊन अत्यावश्यक सेवेतील दुकानांवर होणारी गर्दी टाळण्यासाठी वसई-विरार महापालिकेने नव्या नियमावलीनुसार सकाळी ७ ते ११ ही वेळ निर्धारित केली आहे, मात्र त्यानंतरही विरारमधील रस्त्यांवर 'बाजारगर्दी' होताना दिसत आहे.
मागील काही दिवसांत वसई-विरारमधील कोविड-१९ संक्रमण प्रचंड वाढले आहे. त्या तुलनेत आरोग्य सुविधांचा असलेला अभाव, नागरिकांची बेफिकिरी या सगळ्यामुळे पालिकेने नव्या नियमानुसार अत्यावश्यक सेवेतील दुकाने सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास सांगितले आहे.
या नियमावलीमुळे वसई-विरारमधील रस्त्यावर सकाळी व संध्याकाळी दिसणारी गर्दी कमी होईल, अशी अपेक्षा पालिकेला होती. शिवाय त्यामुळे कोविड-१९ च्या वाढत्या संक्रमणालाही आळा बसेल, अशी शक्यता व्यक्त केली जात होती, मात्र दैनंदिन खरेदीच्या नावाखाली नागरिकांची 'बाजारगर्दी' कायम आहे. मागील वर्षी घेतलेल्या कडक लॉकडाऊनमुळे अनेक लोकांवर उपासमारीचे संकट आले होते; कित्येक लोकांच्या नोकरी गेल्या होत्या. याचे परिणाम म्हणून विरारमधील सामान्य नागरी वस्तीतील नागरिकांनी हाताला मिळेल ते काम स्वीकारले होते. कित्येकांचा कल भाजीविक्रीकडेच होता. अन्य व्यवसाय करणाऱ्यांनीही  नागरिकांची दैनंदिन गरज ओळखून भाजी व तत्सम विक्री व्यवसाय निवडला होता. याचे परिणाम म्हणून मागील वर्षांत वसई-विरारच्या रस्त्यावर फेरी व्यवसाय करणाऱ्यांत प्रचंड वाढ झाली तसेच कोविड-१९चे संक्रमणही वाढल्याचे दिसून आले.
दरम्यान, पालिकेच्या अत्यावश्यक सेवेच्या दुकानांत भाजी व तत्सम व्यवसायांबाबत कोणतेही लायसन्स किंवा हा व्यवसाय कुणी करावा, याबाबत स्पष्टता नसल्याने अशा दुकानांच्या संख्येत वाढ झाली असून  मागील लॉकडाऊननंतर ही संख्या  आणखी वाढली आहे. दुसरीकडे नागरिकही आठवडा खरेदीपेक्षा दैनंदिन खरेदीवर भर देत असल्याने वसई-विरार शहरांवरील कोविड संकट कायम आहे.
माॅलसमोरही मोठी रांग
राज्यभरातील वाढती कोरोना रुग्ण संख्या व नागरिकांची बेफिकिरी पाहता राज्य सरकार पुन्हा एकदा 'कड़क लॉकडाउन' घेईल, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. यामुळे बुधवारी वसई-विरारकर पुन्हा एकदा वाणसामानासाठी घराबाहेर पडलेले दिसले. याचे परिणाम म्हणून शहरातील डिमार्टसमोरही खरेदीकरता भली मोठी रांग लागलेली होती.

Web Title: The markets in Virar are crowded again for goods

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.