लोकमत न्यूज नेटवर्कवाडा : मार्च-एप्रिल-मे महिन्यांमधे मुंबईसह महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात लग्नसराई चालू असते. ह्या लग्नसराई मध्ये झेंडूच्या फुलांना मोठ्या प्रमाणात मागणी असते. ती लक्षात घेऊन या तालुक्यातील शेतकरी मोठ्या प्रमाणात झेंडूची लागवड करतात आणि त्यातून त्यांना दर वर्षी चांगल्याप्रकारे उत्पन्न मिळते. मात्र ह्या वर्षी ऐेन लग्नसराईत झेंडूचे भाव घसरल्याने शेतकऱ्यांवर नुकसनीची कुऱ्हाड कोसळली आहे. सध्या झेंडूच्या फुलांना किलोमागे जेमतेम १० रुपये भाव मिळत असल्यामुळे झेंडू काढण्याचा खर्चही निघत नसल्याने आत्ता काय करावे हा प्रश्न निर्माण झाला आहे. झेंडू काढण्यासाठी माणसांचा लागणारा खर्च तो दादर, कल्याण किंवा वाशी मार्केट पर्यंत घेऊन जाण्याचा खर्च तसेच दलालांचे कमीशन असा सर्व खर्च धरून त्याला प्रतिकिलो किमान ४० ते ५० रूपये भाव अपेक्षित असतो. तो मिळाला तरच ही फुलांची शेती त्याला परवडत असते. मात्र सध्या अवघा १० रुपये प्रतिकीलो भाव मिळत असल्याने त्याची पूर्ण वाताहात झाली आहे. हजारो रुपये खर्च करून सोन्यासारख्या लाल आणि पिवळया रंगानी फुललेल्या शेताचे करायचे तरी काय हा प्रश्न आहे. या फुलांच्या शेतीवर नांगर फिरवून ती नष्ट करण्याचे धाडससुद्धा शेतकऱ्यांना करवत नाही त्यामुळे फुले वाळून जात आहेत.
झेंडूच्या फुलांचे भाव गडगडले
By admin | Updated: May 23, 2017 01:27 IST