शौकत शेख डहाणू : मराठी व गुजराती भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या येथील आदीमाया महालक्ष्मी देवीचा जत्रोत्सव शुक्रवारपासून सुरु होत आहे. पंधरा दिवस चालणाऱ्या या उत्सवासाठी दोन्ही राज्यातून लाखो भाविक येथे येत असल्याचे मंदिर व पोलीस प्रशासनाने सुसज्ज व्यवस्था केली आहे.जत्रेच्या निमित्ताने नाशिक, सिन्नर, मालेगाव, पुणे, मुंबई, जव्हार, मोखाडा, त्र्यंबकेश्वर, वलसा, सुरत, अहमदाबाद तसेच पालघर जिल्ह्यातील हजारो दुकानदार व व्यापारी महालक्ष्मी येथे तीन-चार दिवसापूर्वीच डेरे दाखल झाले आहेत. पंधरा, वीस दिवसांसाठी मोठमोठे मंडप (भोंगे) तयार करून शुक्रवारपासून दुकान, हॉटेल, सर्कस, तमाशावाले यांचा व्यवसाय धुमधडाक्यात सुरू होणार आहे.मुंबई-अहमदार राष्टÑीय महामार्गावरील चारोटी नाक्यापासून तीन कि.मी. तसेच डहाणू येथून २२ कि.मी. अंतरावरील महाराष्टÑ तसेच गुजरात राज्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या तसेच, आदिवासी समाजाची कुलस्वामिनी असलेली व नवसाला पावणारी अशी ख्याती असणाºया महालक्ष्मी मातेचे हे ऐतिहासिक मंदिर आहे.हे मंदिर हायवेला लागूनच असल्याने मुंबई-तसेच गुजरातकडे जाणारे हजारो भाविक मातेचे दर्शन घेऊनच पुढे जातात. वर्षभरात महालक्ष्मी मातेचे चैत्र महिन्यात पंधरा दिवसांची मोठी यात्रा असते. बारशीला हा उत्सव येथील आदिवासी समाज पारंपारिक पद्धतीने साजरे करीत असतात. रात्रभर चालणाºया या उत्सवात डहाणू व त्याच परिसरातील ग्रामिण व शहरी भागातील आदिवासी बांधव मोठ्या उत्साहाने त्यामध्ये भाग घेत असतात. चैत्र महिन्यात भरणाºया महालक्ष्मी मातेच्या यात्रेत गुजरात राज्यातील बलसाड, उमरगाव, संजाण, वापी, बलसाड, नवसारी, सुरत, अहमदाबाद येथील हजारो भाविक येथे अनेक दिवस मुक्कामाला असते.महालक्ष्मी देवी ही जव्हारच्या राजाचे कुलदैवत असून हे देवस्थान खूप श्रीमंत होते. मोहंमद गजनीने या देवस्थानावर स्वारी करून मंदिरातील मौल्यवान रत्ने, सोने, चांदी लुटून नेल्याचा उल्लेख केरीस यांच्या बखरीत आहे. माजी महसूलमंत्री भाऊसाहेब वर्तक यांच्या अध्यक्षतेखाली महालक्ष्मी माता जिर्णोद्धार समिती स्थापून सन १९८५ साली नवीन देवालय पूर्ण केले.विशेष म्हणजे लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या महालक्ष्मी (विवळवेढे) येथे वर्षभरात लाखो भाविक येथे येत असतात. त्यामुळे येणाºया भक्तांना सुविधा मिळाव्यात म्हणून पर्यटन विकास विभागाने येथे लक्ष देणे गरजेचे आहे. पाणी, वीज, रस्ते, सार्वजनिक शौचालय, शासकीय विश्रामगृह, तसेच महालक्ष्मी मातेचा परिसर स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी सुशोभिकरणाबरोबच भाविकांना मुक्कामाला राहण्यासाठी सुसज्ज अशी धर्मशाळा उभारण्याची गरज आहे.
महालक्ष्मी यात्रा आजपासून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2018 01:51 IST