हुक्का पार्लर्सविरोधात आघाडी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2020 11:54 PM2020-02-14T23:54:46+5:302020-02-14T23:54:58+5:30

कर्मचाऱ्यावर विषप्रयोगाची घटना : सामाजिक संघटनांकडून कारवाईची मागणी

Lead against hookah parlors! | हुक्का पार्लर्सविरोधात आघाडी!

हुक्का पार्लर्सविरोधात आघाडी!

Next


आशीष राणे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
वसई : वसईतील शहरी भागात सुरू असलेल्या एका हुक्का पार्लरवर मागील आठवड्यात वसई पोलिसांनी धाड टाकून कारवाई केली होती. या हुक्का पार्लरची ‘टीप’ दिल्याच्या संशयावरून एका कर्मचाºयावर विषप्रयोग केल्याची धक्कादायक घटना घडल्यानंतर आता वसईतील हुक्का पार्लर्सविरोधात सामाजिक संघटनांनीही आघाडी उघडली असून चोहोबाजूंनी संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.
राज्यात सर्वत्र हुक्का पार्लरवर बंदी असतानाही वसई-विरार शहरातील महामार्ग असो वा शहरी भागातील हॉटेल, मॉल, उपाहारगृहे आणि विविध ठिकाणी हुक्का पार्लर सुरू आहेत. पालघर पोलीस अधीक्षक व जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करीत या हुक्का पार्लर्सवर कडक व कायमस्वरूपी बंदीची मागणी सामाजिक संघटनांनी केली आहे, अशी माहिती समीर वर्तक यांनी दिली. दरम्यान, वसई-विरार परिसरातील नवघर-माणिकपूर शहर, पापडी, वसई गाव आणि खासकरून महामार्गावरील हॉटेल आणि उपाहारगृहांमध्ये बेधडक हुक्का पार्लर आजही सुरू आहेत. याशिवाय कित्येक ठिकाणी अनधिकृतपणे हुक्का पार्लर केंद्रे उघडण्यात आली असून त्याकडे अल्पवयीन मुले आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने आकर्षित होत आहेत.
वसईतील अनेक हुक्का पार्लरमध्ये अंमली पदार्थाची छुप्या पद्धतीने विक्र ी होत असून यामुळे वसईची तरुण पिढी नशेच्या आहारी जात असल्याचे नागरिक सांगत आहेत. हुक्का पार्लरवर बंदीचा कायदा असला तरी कायद्याची परिणामकारक अंमलबजावणी होत नसल्यामुळे हुक्का पार्लर चालकांचे फावले आहे, अशी खंतही महिलांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
वसईतील काही मॉलमध्ये दररोज शेकडो नागरिक खरेदी आणि करमणुकीकरिता येतात. यामध्ये महाविद्यालयीन तरुणांची संख्या मोठी असते. या मॉलमध्ये बेकायदा हुक्का पार्लर चालवले जात असून त्यामुळे महाविद्यालयीन विद्यार्थी नशेच्या आहारी जात आहेत तर काही हॉटेलमध्येही हा व्यवसाय जोरदारपणे चालवला जात आहे.
परिणामी वसईतील या हुक्का समस्येबाबत आमच्याकडे तक्रारी येत आहेत. जिल्हाधिकारी तथा पोलीस अधीक्षकांना याबाबत कळवले आहे. हुक्का पार्लर चालवणाºयांवर कठोर कारवाई होणे गरजेचे आहे, असे पर्यावरण संवर्धन समितीचे समीर वर्तक यांनी ‘लोकमत’ला सांगितले.
अनेक ठिकाणी हुक्कापार्लर चालकांची दादागिरी वाढू लागली असून त्यामुळे गुन्हेगारीच्या घटना वाढून कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असल्याच्या मुद्याकडे ‘हरित नैसर्गिक वैभव बचाव’चे मॅकेन्झी डाबरे यांनी वेधले. आतापर्यंत रेल्वे स्थानकालगतच्या परिसरापर्यंत मर्यादित असलेली बेकायदा हुक्का केंद्रे वसईच्या हरित पट्ट्यातही शिरकाव करू लागली आहेत.

पोलीस अधीक्षक यांच्या आदेशानुसार ज्या ठिकाणी अनधिकृत हुक्का पार्लर सुरू आहेत, त्या सर्वांवर कारवाई करण्याचे सक्त निर्देश सर्व पोलीस ठाण्यांना देण्यात आले आहेत. तरी केवळ पोलीसच नव्हे तर सर्वसामान्यांनीही एक जबाबदार नागरिक म्हणून हुक्का पार्लरची माहिती पोलिसांना द्यावी. - विजयकांत सागर, अप्पर पोलीस अधीक्षक, वसई

Web Title: Lead against hookah parlors!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.