पंकज राऊत, बोईसरनियोजित बोईसर ग्रामीण रुग्णालयाला भूखंड मिळाला असून त्याची मोजणी आज करण्यात आल्याने लोकमतचा पाठपुरावा यशस्वी झाला असून दीड दशकाची प्रतिक्षा संपली आहे. बोईसर तारापूर रस्त्यावरील बी.ए.आर.सी. वेअर हाऊस चित्रालय जवळील जुना सर्व्हे नं. १०७ अ नवीन सर्व्हे नं. ३० मधील क्षेत्र १.६०.० हेक्टर आर (चार एकर) जागेची मोजणी व हद्द निश्चिती आज पालघरच्या उपअधीक्षक भूमी अभिलेख यांच्या कार्यालयातर्फे करण्यात आली. लोकप्रतिनिधी व राजकीय पदाधिकाऱ्यांमध्ये श्रेयावरून रंगलेला वाद पहावयास मिळाला.जिल्हा नियोजन व विकास मंडळ ठाणे यांच्या १६ आॅक्टोबर २००३ च्या बैठकीत ठाणे जिल्ह्यातील शिल्लक अनुशेषास अनुसरून बृहद्आराखड्याबाहेरील व आदिवासी क्षेत्रातील बोईसर ग्रामीण रुग्णालय स्थापन करण्यास शासन निर्णयाद्वारे मंजुरी दिली होती. मात्र सुमारे दीड दशकाच्या आसपासचा कालावधी उलटूनही नियोजित जागेसह अनेक प्रश्न लालफितीत अडकल्याने बोईसर व परिसरातील अनेक गावांतील लाखो गोरगरीब आदिवासी आरोग्य सेवेपासून वंचित होते. मात्र आज जमीन मोजणी झाल्याने आता लवकरच बोईसर ग्रामीण रुग्णालय उभारण्याचे काम सुरू होण्याची शक्यता आहे.आज उप अधीक्षक भूमि अभिलेख, पालघरच्या कार्यालयातील निमतानदार भगवान सावंत, वनविभागाचे बोईसर (पूर्व)चे वनपाल भरत मोकाशी, बोईसर ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी गोपाल घुगे या शासकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत जागेची मोजणी सावंत यांनी करून भूप्रदान जागेच्या सीमांकन प्रमाणे चुना घालून मूळ अभिलेखाच्या आधारे नकाशा बसवून जागेच्या हद्दीच्या खुणा दाखविल्या त्याची अ, ब व क प्रत बनवून क प्रत वैद्यकीय अधीक्षक (ग्रामीण रुग्णालय) यांना देण्यात येणार असून आता किमान जागेचा प्रश्न सुटला आहे. तर बोईसरच्या ग्रामीण रुग्णालयाच्या जागेकरीता मागील अनेक वर्षांपासून बोईसर ग्रामपंचायत सामाजिक संस्था, काही राजकीय पक्षाचे पदाधिकारी व पुढारी तसेच अलीकडच्या काळात माजी मंत्री राजेंद्र गावीत, बोईसरचे आमदार विलास तरे यांच्यासह स्थानिक विचार मंचसह आजी माजी लोकप्रतिनिधी प्रयत्न करीत होते. तर लोकमत वृत्तपत्रातही २००३ पासून अनेक वेळा ग्रामीण रुग्णालया संदर्भात वृत्त प्रसिद्ध झाले होते. ३ वर्षांच्या प्रयत्नाने सुमारे दीड दशकानंतर यश आले आहे.
बोईसर रुग्णालयाला भूखंड!
By admin | Updated: March 11, 2016 02:27 IST