- शशी करपे, वसईकिसान विकासपत्रासह फिक्स डिपॉझिट आणि रिकरिंग डिपॉझिटच्या माध्यमातून गुंतवणूक केलेल्यांना मुदत संपून गेली तरी गेल्या तीन महिन्यांपासून मुद्दल व परतावा न मिळाल्यामुळे ग्राहक संतप्त झाले आहेत. पोस्टाचा कारभार इंटरनेटद्वारे सुरू झाला असला तरी सर्व्हर डाऊन होत असल्याने तालुक्यातील सर्वच पोस्टांचा कारभार ठप्प झाला आहे. त्यामुळे ग्राहकांच्या रोषाला बळी पडावे लागत असल्याने कर्मचारीवर्गात भीतीचे वातावरण पसरले आहे. ही परिस्थिती लक्षात घेऊन तालुक्यातील सर्वच पोस्ट आॅफिसेसमध्ये नवीन ठेवी स्वीकारण्याचे काम तात्पुरत्या स्वरूपात बंद करण्यात आले आहे. त्यामुळेही गुंतवणूकदारांची गैरसोय होऊ लागली आहे. वसई तालुक्यात ४६ डाकघर आणि सब आॅफिस आहेत. किसान विकासपत्र, फिक्स डिपॉझिट आणि रिकरिंग डिपॉझिटमध्ये वसई तालुक्यातील प्रत्येक पोस्ट आॅफिसेसमध्ये शेकडो ग्राहकांनी गुंतवणूक केली आहे. त्यातील कित्येकांची मुदत जानेवारी २०१६ मध्ये संपुष्टात आली आहे. त्यामुळे परतावा व मुद्दल मिळण्यासाठी ग्राहकांनी पोस्टात धाव घेतली. मात्र, सर्व्हर डाऊन असल्यामुळे या ग्राहकांना त्यांची रक्कम देण्यास पोस्टातील कर्मचाऱ्यांनी असमर्थता व्यक्त केली. त्यानंतर, अनेकदा फेऱ्या मारल्यानंतरही त्यांना परताव्याचा धनादेश देण्यास पोस्टमास्तरांनी असमर्थता व्यक्त केल्यामुळे ग्राहक संतप्त झाले आहेत. देशभरात हीच परिस्थिती असल्यामुळे आणि वारंवार सर्व्हर डाऊन असल्याचे कारण सांगितले जात असल्यामुळे काही जणांनी त्यांच्या कार्यपद्धतीवर संशयही घ्यायला सुरुवात केली आहे. आमचे लाखो रुपये गेल्या महिन्यापासून पोस्टात अडकून पडले आहेत आणि कर्मचारी वारंवार सर्व्हर डाऊन असल्याची कारणे सांगत आहेत. त्यामुळे आमच्याकडून त्यांना काही आर्थिक अपेक्षा आहेत का, असा सवाल ग्राहकांनी केला आहे. तर, महिन्यातून अनेकदा सर्व्हर डाऊन असतो.कॉम्प्युटरही वारंवार हँग होतात. पाचपैकी एकच कॉम्प्युटर नीट चालतो. दुरुस्तीसाठी रस्ते वारंवार खोदले जात असल्यामुळे आमच्या टेलिफोनच्या, इंटरनेटच्या केबल तोडल्या जातात. अशा अनेक कारणांमुळे ग्राहकांना त्यांच्या रकमेचा परतावा वेळेवर करता येत नाही. परिणामी, संतप्त ग्राहकांची समजूत घालणे कठीण झाल्याची खंत पोस्ट कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली. तांत्रिक अडचण कारणीभूत पोस्टाच्या मुख्य सर्व्हरमध्ये तांत्रिक अडचण निर्माण झाली आहे. तर, प्रत्येक पोस्ट कार्यालयाला कॉम्प्युटर दिले असले तरी त्या ठिकाणी इंटरनेट कनेक्शनची मर्यादा घातली गेल्याने तांत्रिक अडचण निर्माण झाली आहे. वरिष्ठ पातळीवर तक्रार करूनही तांत्रिक कर्मचारी ही अडचण दूर करीत नाहीत. परिणामी, सेवा ठप्प झाली आहे, अशी माहिती एका पोस्टमास्तरने दिली. टोलवा टोलवीने संताप दरम्यान, याप्रकरणी पोस्टातील कुणीही अधिकृत माहिती देण्यास तयार नाही. बोरिवली येथील जनसंपर्क अधिकारी विकास सत्पाळकर यांच्याशी संपर्क साधला असता याप्रकरणी माहिती देता येत नाही. पोस्ट आॅफिसच्या मुख्य कार्यालयातून माहिती घ्या, असे उत्तर दिले. तर मीरा रोड येथील कार्यालयातील अधीक्षक युसूफ मोहम्मद यांच्याशी संपर्क साधण्याचा वारंवार प्रयत्न केला असता एक तर फोन सतत एंगेज लागत होता. रिंग वाजली तर कुणी उचलत नव्हते.काही पोस्टांत ग्राहकांच्या संतापाचा उद्रेकमुदतीत परतावा न झाल्यामुळे मुंबईतील माटुंगा, मालाड आणि कांदिवली येथील पोस्टाच्या कार्यालयावर ग्राहकांनी हल्ला केला आहे. काही ठिकाणी तर संगणकाचीही तोडफोड करण्यात आली आहे. त्यामुळे कर्मचारी भयभीत झाले आहेत. मीरा रोड ते डहाणू पोस्ट कार्यालयाच्या मीरा रोड येथील मुख्यालयाला तर पोलिसांचे संरक्षणही घेण्यात आले आहे. या कार्यालयातील फोन लागला तरी कुणी उचलत नाही. सर्व्हर सुरू कधी सुरू होईल, याचा नेम नसल्यामुळे पोस्टातील कर्मचारी सकाळी ६ वाजल्यापासून रात्री ११ पर्यंत कार्यालयात बसून आहेत. सर्व्हर नियमित झाल्यास ग्राहकांना परतावा मिळेल. त्यांचे समाधान होईल आणि आम्हीही सुटकेचा नि:श्वास सोडू, असा विश्वास कर्मचाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
इंटरनेटच्या कूर्मगतीने पोस्टाचे व्यवहार ठप्प
By admin | Updated: April 3, 2016 03:51 IST