पालघर : नांदगाव येथील जिंदाल समूहाची प्रस्तावित जेट्टी तयार झाल्यास महाराष्ट्र देशामध्ये जास्त मालवाहतूक करणारे राज्य ठरू शकेल, मात्र असे करताना स्थानिक ग्रामस्थांना विश्वासात घेतल्याशिवाय यासंदर्भातील कोणतेही काम केले जाणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत दिली. पालघर येथील नांदगाव तर्फ तारापूर येथील प्रस्तावित जट्टीला स्थानिक ग्रामस्थांचा विरोध असल्याबाबतचा प्रश्न मंगळवारी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात उपस्थित करण्यात आला होता. विधानसभा सदस्य मनीषा चौधरी, राधाकृष्ण विखे-पाटील यांनी यासंदर्भातला प्रश्न विचारला होता. फडणवीस या प्रश्नाला उत्तर देताना म्हणाले की, सन २०११ ते सन २०१४ या काळात या प्रस्तावित जेट्टीसाठी आवश्यक असणाऱ्या सर्व परवानग्या शासनाकडून देण्यात आल्या आहेत. तर या वर्षी केंद्र शासनाच्या पर्यावरण विभागानेही परवानगी दिली आहे. मात्र, असे असले तरी याबाबत येथील स्थानिकांनी राष्ट्रीय हरित लवादाकडे तक्र ार केली आहे. त्यामुळे या प्रकरण आता राष्ट्रीय हरित लावादाकडे न्यायप्रविष्ट आहे. नांदगाव जेट्टी आणि वाढवण बंदर यासंदर्भात राज्य शासनामार्फत अभ्यास करण्यात येत आहे. सदर प्रस्तावित जेट्टी उभारण्याचे काम राज्य शासन आणि शिपिंग कॉर्पोरेशनच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. या जेटीमुळे महाराष्ट्र अधिक समृध्द होण्यास मदत होईल,असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला. (प्रतिनिधी)
‘जेट्टीचे काम ग्रामस्थांना विश्वासात घेऊनच’
By admin | Updated: July 28, 2016 03:26 IST