हितेन नाईक
पालघर - भारताच्या एका मच्छिमाराने पाकिस्तानच्या कराची येथील मलीर तुरुंगात मंगळवारी आत्महत्या केली. ही बाब अतिशय गंभीर असल्याचे जेष्ठ पत्रकार आणि शांततावादी कार्यकर्ते जतीन देसाई ह्यांनी सांगितले.
पाकिस्तानी तुरुंगात अजूनही १९४ भारतीय मच्छीमार खितपत पडले आहेत. ५३ वर्षाच्या या मच्छीमाराची २०२२ मध्ये पाकिस्तानच्या मेरीटाईम सिक्युरिटी एजन्सीने अटक केली होती. त्याच वर्षी त्याची शिक्षा पण पूर्ण झाली होती. मात्र एखाद्या भारतीय मच्छीमार कैद्यांनी पाकिस्तान तुरुंगात आत्महत्या करण्याचा हा पहिलाच प्रकार असल्याचे देसाई ह्यांनी लोकमतला सांगितले.
शिक्षेचा कालावधी भोगल्यानंतरही तुरुंगातून सुटका होत नसल्याने कंटाळलेल्या मानसिक अवस्थेतून त्या मच्छीमाराने आत्महत्या केली असण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचेही देसाई ह्यांनी सांगितले. शिक्षा पूर्ण झाल्यानंतर देखील घरी आपल्या कुटुंबियांना भेटण्याची इच्छा पूर्ण होत नसल्याच्या मानसिकतेतून त्या मच्छीमारांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचे ते म्हणाले. आपल्या शिक्षेचा कालावधी पूर्ण झाला असतानाही आपल्याला मायदेशात आपल्या घरी जाता येत नसल्याचे शल्य कराची येथील तुरुंगातील सर्व भारतीय कैद्यांना असून केंद्र शासनाने आतातरी या सर्व मच्छीमारांना तत्काळ त्यांच्या घरी पाठवण्याबाबत पावले उचलण्याची मागणी देसाई ह्यांनी केली.