बोईसर : चाळीस टक्के पाणी कपातीनंतर तीव्र टंचाईला सामोरे जात असलेल्या सालवड, पास्थळ व बोईसर ग्रामपंचायतीने आंदोलनाचे पत्र देताच एमआयडीसीच्या वरीष्ठ अधिकाऱ्यांनी ग्रामपंचायतीच्या प्रतिनिधींची आज बैठक घेऊन पाणी पुरवठा जास्तीत जास्त सुरळीत करण्याचे आश्वासन दिले मात्र आज देण्यात आलेले आश्वासन न पाळल्यास उग्र आंदोलन करण्याचा इशारा उपस्थित प्रतिनिधिंनी दिला आहे.अतिरिक्त सांडपाण्यावर नियंत्रण आणण्याकरिता राष्ट्रीय हरीत लवादाच्या आदेशानंतर एमआयडीसी ने तारापूर औद्योगिक क्षेत्राबरोबरच औद्योगिक क्षेत्रालगतच्या ग्रामपंचायतीच्या प्रतिनिधींना ग्रामस्थांच्या रोषाला सामोरे जावे लागत असल्याने तिन्ही ग्रामपंचायतीने दि. ३ व ४ असे दोन दिवस आंदोलन करण्याचा इशारा दिला होता.आज तारापूर एमआयडीसी च्या कार्यालयात एमआयडीसीचे अधिक्षक अभियंता रमाकांत पंडितराव, कार्यकारी अभियंता एम. एस. कलकुटकी, उपअभियंता त.म. करवा, आर पी. पाटील या अधिकाऱ्यांनी ग्रामपंचायतीच्या प्रतिनिधींची बैठक घेतली. त्या बैठकीस सालवडच्या सरपंच सुगंधा पाटील, पास्थळच्या सरपंच मंजुळा गोवारी, पास्थळचे उपसरपंच गोपिनाथ घरत, बोईसरचे उपसरपंच राजू करवीर, सालवडचे ग्रामपंचायत सदस्य संजय ना. पाटील, पास्थळचे सदस्य हरेश इ. उपस्थित होते.बैठकीत राष्ट्रीय हरित लवादाच्या आदेशान्वये चाळीस टक्के पाणी कपात सुरू केल्याचे अधिक्षक अभियंता रमाकांत पंडितराव यांनी ग्रामपंचातीच्या प्रतिनिधींना सांगितले. त्यावेळी अधिक्षक अभियंत्यांनी पाण्याचा साठा कमी पडणार नाही यासाठी जेवढे करता येईल तेवढे करा, असा आदेश एमआयडीसीच्या पाणीपुरवठा अधिकाऱ्यांना दिला. यापूर्वी दिलेली आश्वासने कृतीत उतरलेली नाहीत त्यामुळे संतप्त झालेल्या ग्रामपंचायतीच्या प्रतिनिधींनी पाणी पुरवठ्यात सुधारण न झाल्यास तीव्र आंदोलन करू त्याची जबाबदारी एमआयडीसीवर असेल असा इशारा दिला. (वार्ताहर)>काय आहे वस्तुस्थिती?आम्हास मुळातच कमी दाबाने होणाऱ्या अपुऱ्या पाणी पुरवठ्याला सतत तोंड द्यावे लागते त्यामध्ये ४० टक्के पाणी कपातीची भर पडल्याने ग्रामस्थ पाण्यावाचून हवालदिल झाले असून रोज त्यांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. अशी वस्तुस्थिती सरपंच व उपसरपंचांनी मांडली.
पाणी न मिळाल्यास ग्रामस्थांचे उग्र आंदोलन
By admin | Updated: November 4, 2016 02:59 IST