नालासोपारा (मंगेशकराळे) - घरफोडी चोरी करणाऱ्या सराईत आरोपींना अटक करण्यात गुन्हे शाखेच्या युनिट तीनच्या पोलिसांना यश मिळाले आहे. आरोपींवर यापूर्वीचे आठ गुन्हे दाखल असून तपास व चौकशीसाठी वसई पोलिसांच्या ताब्यात दिल्याची माहिती जनसंपर्क अधिकारी व सपोनि शिवकुमार गायकवाड यांनी शनिवारी दिली आहे.
वसईच्या बाभोळा येथील सायलेंट पार्कमध्ये राहणारे अली थांडलावाला (३२) यांच्या घरी २२ मार्चला संध्याकाळी लाखोंची घरफोडी झाली होती. चोरट्यांनी बंद घराचे लॉक तोडून घरात प्रवेश करून बेडरूममध्ये असलेल्या लोखंडी कपाटातील तिजोरीमधून सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण ९ लाख २२ हजारांचा मुद्देमाल चोरून नेला होता. वसई पोलिसांनी घरफोडीचा गुन्हा दाखल केला होता. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सदर गंभीर गुन्ह्यातील आरोपीचा शोध घेवून लवकरात लवकर गुन्हा उघडकीस आणण्यासाठी आदेश दिले होते.
सूचना व आदेशान्वये गुन्हे शाखेचे युनिट तीनचे पोलीस अधिकारी व अंमलदारांनी गुन्ह्याच्या घटनास्थळी भेट देवून गुन्ह्याच्या समांतर तपासादरम्यान सीसीटीव्ही फुटेजमध्ये संशयीत आरोपी निष्पन्न केले. तांत्रिक विश्लेषण व मिळालेल्या बातमीवरून आरोपी इम्रान शेख (३४) आणि मुशीर खान (४०) या दोन्ही आरोपींना ३ एप्रिलला ताब्यात घेतले आहे.
सदरची कामगिरी पोलीस उपायुक्त (गुन्हे) अविनाश अंबुरे, सहायक पोलीस आयुक्त मदन बल्लाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शाहूराज रणवरे, सपोनि सुहास कांबळे, पोहवा मुकेश तटकरे, रमेश आलदर, सागर बारवकर, प्रशांत पाटील, अमोल कोरे, राकेश पवार, सुनिल पाटील, युवराज वाघमोडे, सुमित जाधव, आतिश पवार, तुषार दळवी, मनोहर तारडे, मसुब प्रविण वानखेडे, गणेश यादव, सागर सोनवणे आणि सायबरचे सफौ संतोष चव्हाण यांनी केली आहे.