वसई : मुंबई हायकोर्टाच आदेशानुसार वसईच्या प्रांताधिकाऱ्यांनी भुईगाव परिसरातील सरकारी जमिनीवरील बेकायदा बांधकामे उध्वस्त करण्याची मोहिम हाती घेतली. एकाने विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याने कारवाई काही वेळ थांबवावी लागली होती.भुईगाव समुद्रकिनारी असलेल्या पाचशे एकर सरकारी जमिनीवर अतिक्रमण करून त्याठिकाणी बेकायदा बांधकामे झाल्याची जनहित याचिका फ्रान्सिस डिसोझा यांनी मुंबई हायकोर्टात दाखल केली होती. त्यावर निर्णय देताना हायकोर्टाने सोमवारी कारवाई सुरु करून अहवाल सादर करण्याचे आदेश प्रांताधिकाऱ्यांना दिले होते. प्रांंताधिकारी दादाराव दातकर यांनी १५० पोलिसांच्या फौजफाट्यासह कारवाईला सुरुवात केली. सॅबेस्टीन नाडर यांच्या घरापासून कारवाई सुरु करण्यात येणार होती. त्यावेळी सॅबेस्टीन यांचा मुलगा रोमन नाडर (२७) याने कारवाईला विरोध करण्यासाठी विष पिऊन आत्महत्या करण्याचा पय्रत्न केला. त्यामुळे गावात एकच गोंधळ उडाला होता. यानंतर कारवाईला विरोध करण्यासाठी मोठा जमाव जमला होता. रोमनला उपचारासाठी वसईच्या कार्डीनल ग्रेसस हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. दुपारनंतर कारवाईला सुुुरुवात करण्यात आली. कारवाईत एका घराचा चौथरा तोडण्यात आला. तसेच काही झोपड्या तोडण्यात आल्या. कारवाई होण्याआधी तहसीलदार कचेरीतून संबंधितांना नोटीसाही बजावण्यात आल्या होत्या. त्यात २३ जुलैपर्यंत बांधकामे स्वत:हून तोडून टाकण्याचे आदेश दिले होते. मात्र, नोटीसीनंतरही बांधकामे पाडली न गेल्याने महसूल खात्याने सोमवारपासून बांधकामे तोडण्याची कारवाई हाती घेतली आहे. (प्रतिनिधी)
भुईगाव अतिक्रमणांवर हातोडा
By admin | Updated: July 26, 2016 03:10 IST