विरार : निवासी संकुलांमध्ये झालेल्या अतिरिक्त बांधकामांकडे वसई विरार पालिका प्रशासनाने आता डोळे वटारले आहेत. आज पालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने वसई पूर्वेतील एव्हरशाईनसिटीत असलेल्या बहार क्लासिक गृहसंकुलात करण्यात आलेले पत्र्याच्या शेडचे अतिक्रमण जमिनदोस्त केले. पालिकेच्या या कारवाईमुळे एव्हरशाईनसिटीत गार्डनच्या जागेचा वाणिज्य वापरासाठी वापर करणाऱ्या बांधकामधारकांचे मात्र त्यामुळे चांगलेच धाबे दणाणले आहेत.एव्हरशाईनसिटीत रोडला लागून मोठ्या प्रमाणात गृहसंकुले आहेत. त्यातील रोडला लागून असलेल्या सदनिकांच्यापुढे त्यांच्या मालकीची छोटी गार्डन्स देखील आहेत. परंतु वाढत्या नागरीकरणाच्या वेगात सुरुवातीला काही सदनिकाधारकांनी या गार्डनवर शेड टाकून त्याजागेचा वाणिज्य वापरासाठी उपयोग सुरु केला होता. पुढे हे प्रकार मोठ्या प्रमाणात वाढीस लागले. सोसायट्या व मनपा प्रशासनाकडून अतिरिक्त बांधकामांबाबत कोणतीच कारवाई होत नसल्याने पुढे या प्रकारांचे पेवच फुटले आणि अतिरिक्त बांधकामांमध्ये मोठ्या प्रमाणात खासगी कार्यालये, दुकाने थाटण्यात आली. अशाच प्रकारे बहार क्लासिक या गृहसंकुलातील रजनीगंधा इमारतीतही मोठी पत्र्याची शेड उभारण्यात आली होती. या अतिरिक्त बांधकामांवर सोसायटीतील काही सदस्यांनी हरकत घेऊन मनपा प्रशासनाकडे तक्रार केली होती. या तक्रारीची दखल घेऊन आज मनपाच्या अतिक्रमण विरोधी पथकाने ही शेड जमिनदोस्त केली.(प्रतिनिधी)मनपाने प्रथमच केली निवासी अतिक्रमणांवर कारवाई मनपाने प्रथमच अवैध वाढीव बांधकामांवर कारवाई केल्याने अन्य बांधकामधारकांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत. दुसरीकडे अशा प्रकारच्या बांधकामासंदर्भात सोसायट्यांकडून तक्रारी प्राप्त झाल्यास निश्चित कारवाई केली जाईल असे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.
संकुलातील अतिक्रमणांवर हातोडा
By admin | Updated: April 14, 2016 00:46 IST