वनवासी गावातील गोवरी पोहोचली नाशिकच्या बाजारात; स्थानिक महिलांना मिळाला रोजगार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2021 02:16 AM2021-03-21T02:16:28+5:302021-03-21T02:16:37+5:30

एका महिलेला एक गोवरी तयार करण्याचे सहा रुपये दिले जातात. एक महिला साधारण ५० गोवऱ्या दिवसाला तयार करते

Gowri from Vanvasi village reaches Nashik market; Local women got employment | वनवासी गावातील गोवरी पोहोचली नाशिकच्या बाजारात; स्थानिक महिलांना मिळाला रोजगार

वनवासी गावातील गोवरी पोहोचली नाशिकच्या बाजारात; स्थानिक महिलांना मिळाला रोजगार

googlenewsNext

हुसेन मेमन

जव्हार : श्री गुरुजी रुग्णालय नाशिक संचालित सेवा संकल्प समितीअंतर्गत अदिवासी पाड्यांवर ग्रामीण भागात उपलब्ध असलेले पशुधन आणि त्यापासून मिळणारे शेण एकत्र करून त्यापासून एक विशिष्ट साचा वापरून होळी सणासाठी व इतर वेळी उपयोगात येणाऱ्या गोवऱ्या तयार करण्याचा एक आगळावेगळा उपक्रम जव्हार तालुक्यातील वनवासी या गावात सुरू करण्यात आला आहे. ग्रामीण भागातील आदिवासी महिलांना या कामातून रोजगार उपलब्ध झाला आहे. 

वनवासी गावात पशुधन मुबलक प्रमाणात उपलब्ध असल्याने श्री गुरुजी रुग्णालय नाशिकच्या सेवा संकल्प समितीच्या माध्यमातून या गावातील ४५  आदिवासी महिलांना एक विशिष्ट प्रकारचा साचा बनवून देण्यात आला आहे. शेणाच्या गोवऱ्या कशा बनवाव्यात याबाबत प्रशिक्षणही देण्यात आले आहे. विशिष्ट आकाराचे बॉक्सदेखील देण्यात आले आहेत.

एका महिलेला एक गोवरी तयार करण्याचे सहा रुपये दिले जातात. एक महिला साधारण ५० गोवऱ्या दिवसाला तयार करते, त्यामुळे तिला दिवसभरात ३०० रुपये मजुरी मिळत आहे, अशा ४५ महिलांना दररोज जवळपास ३०० रुपये रोज कमावण्याची संधी उपलब्ध झाली आहे. त्यामुळे येथील महिलांची कमाई सुरू झाली आहे. विशेष म्हणजे हा माल त्यांना बाजारात जाऊन विक्री करावा लागत नाही तर हा संपूर्ण माल संस्थेच्या वतीने विकत घेतला जातो. त्यामुळे त्यांना इतर खर्चाची मोठी बचत होत आहे. 

अदिवासी महिलांना रोजगार मिळावा हा प्रमुख उद्देश असून ही गोवरी शुद्ध देशी गाईंच्या शेणापासून बनविलेली आहे. ही गोवरी पर्यावरणाचे रक्षण करणारी असून कीटकनाशक आहे. आताच्या बदललेल्या काळात याची नितांत गरज आहे. या गोवरींची राख, खते म्हणून व इतर कारणांसाठी उपयुक्त आहे. यामुळे होळीव्यतिरिक्त इतर धार्मिक कार्यक्रम जसे की, होमहवन, अग्निहोत्र इ.साठीसुद्धा उपयोगी आहे. - डॉ. राजेंद्र खैरे, कार्यवाह  सेवा संकल्प समिती व श्रीगुरुजी रुग्णालय, नाशिक

होळीसाठी लागणाऱ्या गोवऱ्या आपल्या गावातून जात आहेत आणि ४५ महिलांना रोजगार उपलब्ध होऊन संसारासाठी काही पैसे गावात काम करून मिळणार असल्याचे खूप समाधान वाटते. - मीरा निवृत्ती गोताराने, वनवासी, रहिवासी

Web Title: Gowri from Vanvasi village reaches Nashik market; Local women got employment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.