विक्रमगड : मंगूर मत्स्य पालनाने विक्र मगड तालुक्यातील हातने गावातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. या गावाच्या हद्दीत व देहर्जेे नदी पात्राच्या लगत आमीन फार्म प्रा.लि. मध्ये असलेल्या सात तलावांमध्ये मंगूर माशांचे पालन व उत्पादन केले जाते. या माशांना कोंबडीची सडलेली आतडी, कुजलेले मांस हे खाण्यास टाकले जात असल्यामुळे गावामध्ये तसेच आजूबाजूला दुर्गंधी पसरली आहे. त्याच बरोबर हे दूषित पाणी देहर्जे पात्रात सोडले जात असल्याने नदीचे पाणीसुद्धा दूषित होत आहे. त्यामुळे आजू-बाजूच्या गावामध्ये रोगराई पसरण्याची भीती निर्माण झाली आहे. तसेच या तलावांमधील दूषित पाण्यामुळे गाव परिसरात डासांची पैदास मोठ्या प्रमाणात वाढली आहे. या बाबत ग्रामपंचायतीने या फार्मच्या मालकाला नोटीस बजावली आहे तरीही त्याने त्याकडे दुर्लक्ष करुन हे उत्पादन सुरूच ठेवले आहे.याबाबत येथील ग्रामस्थांनी वेळोवेळी शासनाला निवेदने दिलीत. त्यांच पाठपुरावाही केला. त्यानंतर आरोग्य विभागाने प्राथमिक आरोग्य केंद्राच्या पथकासहीत चौकशी करून या मत्स्यपालनाने आजूबाजूच्या गावातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असल्याचा अहवाल गटविकास अधिकाऱ्यांना सादर केला आहे. मात्र या मत्स्यपालन प्रकल्पावर आजपर्यंत कुठल्याही प्रकारची कारवाई करण्यात आलेली नाही. त्यामुळे पाणी कुठे मुरते आहे, असा प्रश्न ग्रामस्थांच्या मनात निर्माण झाला आहे. (वार्ताहर)
मत्स्यप्रकल्पाने देहर्जे प्रदूषित
By admin | Updated: November 10, 2016 02:46 IST