पारोळ : आपल्या दीड वर्षांच्या मुलीला प्रत्यक्ष जन्मदात्यानेच ठार मारल्याची घटना विरार पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. हस्ती तुषार संघवी असे या दुर्दैवी मुलीचे नाव असून तुषार संघवी (३५) या निर्दय बापाने तिचे पाय पकडून खाली आपटत तिची हत्या केली. तुषार याला विरार पोलीसांनी ताब्यात घेतले आहे.तुषार आणि आरती यांचे चार वर्षापुर्वी लग्न झाले. मुलगी हस्तीसह ते विरार रेल्वेस्टेशन जवळ राहत होते. गणपतीसाठी आरती माहेरी आशापुरी चाळ, कारगिल नगर येथे गेली होती. गणेशोत्सव झाला तरी ती घरी न आल्याने तुषार आरतीला घ्यायला रविवारी संध्याकाळी कारगिल नगर येथे गेला. तेव्हा आरती आणि तुषार यांचे जोरदार भांडण झाले. भांडणादरम्यानच आरतीच्या खांद्यावर असलेल्या हस्तीला घेण्यासाठी तुषार याने हात पुढे केले. हस्ती वडिलांकडे गेली पण त्या निर्दय बापाने तिचे पाय धरत तीला खाली आपटून ठार केले.मानवतेला काळीमा फासणारी ही घटना असून तुषार पळुन जाण्याच्या तयारीत असताच आम्ही त्याला ताब्यात घेतले. आरोपीला कठोर शिक्षा व्हावी यासाठी ठोस पुरावे मिळाल्याचे विरार पोलीस निरिक्षक सुनिल माने यांनी लोकमतला सांगितले. (वार्ताहर)
पित्याने केली पोटच्या मुलीची हत्या
By admin | Updated: October 1, 2015 01:34 IST