- शशी करपे, वसई
महापालिकेच्या लेखापरिक्षण अहवालात आरोग्य खात्याकडून औषधखरेदी प्रक्रियेत अनियमितता असल्याचा ठपका ठेवण्यात आला होता. याप्रकरणी विधीमंडळात आमदारांनी विचारलेल्या तारांकित प्रश्नाच्या उत्तरात मात्र पालिकेने केलेल्या अंतर्गत लेखा परिक्षण अहवालात औषध खरेदी प्रक्रियेत कोणतीही अनियमितता आढळून आली नसल्याचे सांगण्यात आले आहे. औषधखरेदी प्रक्रीयेमध्ये झालेल्या गैरव्यवहारा प्रकरणी विधिमंडळात उपस्थित केलेल्या तारांकीत प्रश्नाला वसई-विरार शहर महानगरपालिका प्रशासनाकडून चुकीची आणि दिशाभूल करणारी माहिती देण्यात आल्याचा आरोप गटनेते धनंजय गावडे यांनी केला आहे. आरोग्य विभागातील औषधांचे मिळालेले नग, त्यापैकी वापरात आलेले नग आणि प्रत्यक्षात शिल्लक नग यामध्ये तफावत आढळून आल्याची बाब एप्रिल २०१६ मध्ये उघडकीस आणली होती. वास्तविक पाहता वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या सन २०१३-१४ च्या लेखापरीक्षण अहवालावरूनच ही बाब निदर्शनास आली होती. पालिकेच्या डी.एम. पेटीट रुग्णालात आॅक्सीजन रिफिंलिंग ठेका देताना दोन वेळा मुदतवाढ दिली आहे. ही मुदतवाढी निमबाह्य असल्याचा ठपका लेखापरिक्षण अहवालात ठेवण्यात आला आहे. तफावत असलेले नग कोणत्या ठिकाणी वापरण्यात आले याची लेखापरिक्षणास खात्री करता आलेली नाही. तसेच साठा नोंदवही मध्ये प्रत्येक वस्तू निहाय एकत्रित गोषवारा काढून त्यावर प्राधिकृत अधिकाऱ्याची स्वाक्षरी घेतल्याचे लेखापरिक्षणास आढळून आलेले नाही, असे अनेक ठपके अहवालात नोंदवण्यात आले आहेत. याप्रकरणी गावडे यांनी दिनांक २५ एप्रिल२०१६ रोजी सविस्तर तक्रार करून कार्यवाही करण्याची मागणी शासनाकडे आणि महानगरपालिकेकडे केली होती. असे असतांना ही तक्रारीच्या अनुषंगाने पालिका आयुक्तांनी मुख्य लेखापरीक्षकाकडून अंतर्गत लेखापरीक्षण केले असता या तक्रारीत तथ्य आढळून आले नसल्याची माहिती दिली आहे.जी बाब वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या लेखा परीक्षकांनीच वर्ष २०१३-१४ मध्ये उघडकीस आणली होती त्याच बाबींसंदर्भात आता त्याच लेखापरीक्षकांना तथ्य आढळून येत नाही असे सभागृह आणि शासनाची दिशाभूल करणारे उत्तर दिल्याचा आरोप गावडे यांनी केला आहे. महापालिकेची माहिती दिशाभूल करणारीतारांकीत प्रश्न या संसदीय आयुधाचे अनन्यसाधारण महत्व आहे. सार्वजनिक दृष्ट्या महत्वाच्या प्रकरणास न्याय देण्यासाठी विधिमंडळ सदस्य या आयुधांचा प्रभावी वापर करीत असतात. अशा तारांकीत प्रश्नाला अधिकाऱ्यांकडून माहिती देत असतांना सर्व कागदपत्रांची पडताळणी करूनच सत्य माहिती देणे अभिप्रेत आहे. येथे मात्र महानगरपालिकेकडून देण्यात आलेली माहिती ही चुकीची आणि दिशाभूल करणारी आहे,असे गावडे यांचे म्हणणे आहे. शिवसेनेचे महाड मतदार संघाचे आमदार भरतशेठ गोगावले, भाजपचे आमदार सरदार तारासिंग, आमदार अमीन पटेल, आमदार विजय वडेट्टीवार, आमदार के. सी. पाडवी यांनी विधिमंडळाच्या अधिवेशनात तारांकीत प्रश्न उपस्थित केला होता.