वसई (पालघर) : दारूच्या नशेत मित्राची हत्या करून फरार झालेल्या आरोपीला वालीव पोलिसांनी तीन दिवसांत गजाआड केले. १८ नोव्हेंबरला वसई पूर्वेकडील गिदाराई पाड्यातलगत निर्जनस्थळी एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह सापडला होता. वालीव पोलीस निरीक्षक संजय हजारे यांनी आपल्या पथकासह कोणताही पुरावा नसताना तपास केला.हनुमान पटेल (३५)असे मयत इसमाचे नाव असून, त्याची हत्या त्याचा मित्र सुनील लुगुन याने केल्याची कबुली दिली आहे. हनुमान आणि सुनील येथील मिनाली चाळीतील एका खोलीत राहत. १८ नोव्हेंबरला दारू पिऊन सुनील पहाटे १ वाजता घरी आला होता. या वेळी हनुमानने दरवाजा उघडायला उशीर केला. त्यामुळे सुनील संतापला होता. संतापाच्या भरात सुनीलने हनुमानला लाकडी दंडुक्याने बेदम मारहाण केली. संतापलेल्या सुनीलने हनुमानाला घराबाहेर काढून दंडुक्याने डोक्यावर आणि छातीवर प्रहार केले. त्यात हनुमानचा मृत्यू झाला. पुरावा नष्ट करण्यासाठी हनुमानचा मृतदेह निर्जन ठिकाणी गवतात टाकून सुनील फरार झाला होता.
दारूच्या नशेत मित्राची हत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2017 05:22 IST