मीरारोड - भाईंदर पश्चिमेच्या मॅक्सस मॉल जवळ एका भटक्या पिसाळलेल्या कुत्र्याने १२ पादचारायांना चावुन जख्मी केले. पालिकेच्या श्वान पथकातील कर्मचारायासह लहान बालकं, महिला, ज्येष्ठ नागरीकांना या कुत्र्याने चावे घेतले. पालिकेच्या पथकास पकडता येत नसल्याने काही इसमांनी त्याला दांडा आदीने मारुन हत्या केली. दरम्यान सदर पिसाळलेला कुत्रा राजरोस शहरात फिरत असताना महापालिकेचा श्वान निर्बीजीकरण विभाग करत काय होता ? असा संतपत सवाल नागरीक करत आहेत. तर पालिकेच्या जोशी रुग्णालयात उपचारासाठी गेलेल्यांना साधी अॅन्टी रॅबिजची लस सुध्दा नसल्याचे सांगण्यात आले.रविवारचा दिवस असल्याने मॅक्स मॉल परिसरात गर्दी होती. तोच अचानक एका जख्मी अवस्थेतील पिसाळलेल्या कुत्र्याने रस्त्यावरुन जाणाऱ्यांना चावायला सुरवात केली. या मुळे एकच घबराट माजली. कुत्रा ज्याच्या त्याच्या अंगावर धाऊन चावा घेत होता. त्याला हुसकावुन लावण्याचा प्रयत्न करणारायांच्या अंगावर सुध्दा तो धाऊन गेला.पालिकेच्या श्वान निर्बीजीकरण केंद्रातील पथकास पाचारण करण्यात आले. कर्मचारायाने त्याला पकडण्याचा प्रयत्न केला असता त्याच्या अंगावर सुध्दा झेप घेऊन त्याने चावा घेतला. पालिका पथकास कुत्र्यास पकडणे आटोक्या बाहेरचे होत असल्याचे पाहुन अखेर काही इसमांनी त्याला दांडा, फावडा, दगडने मारुन त्याची हत्या केली.कुत्रा चावल्याने जवळपास १२ जणं जख्मी झाले. या मध्ये महिला, लहान मुलगी, ज्येष्ठ व अन्य नागरीकांचा देखील समावेश आहे. जख्मींना बाजुलाच असलेल्या महापालिकेच्या पंडित जोशी रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले . तेथे त्यांच्यावर उपचार करण्यात आले. परंतु कुत्रा चावल्याने अॅन्टी रॅबिजची लस घेणे अत्यावश्यक असताना रुग्णालयात सदरची लसच नव्हती. जख्मींना लस बाहेरुन आणण्यास सांगण्यात आली. त्यामुळे काहींनी बाहेरुन जास्त पैसे मोजुन लस खरेदी केली. जख्मी झालेल्या १२ जणां पैकी ८ जणांना उपचार करुन सोडुन देण्यात आले . तर चार जणांना रुग्णालयात दाखल करुन घेतले.
भाईंदरमध्ये पिसाळलेल्या कुत्र्याने घेतला १२ जणांचा चावा; कुत्र्याची हत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2019 13:28 IST