डोंबिवली - गेल्या काही दिवसांपासून ठिकठिकाणी स्वच्छता मोहिमा सुरु आहेत सुरू झाल्या. नागरिकांमध्येही स्वच्छतेबाबत बऱ्यापैकी जाणीव निर्माण झाल्याचे चित्र दिसले. मात्र पश्चिम रेल्वेच्या ट्रेनमध्ये लागलेले स्टीकर अजूनही तसेच असून ट्रेनची स्वच्छता कधी होणार, स्टीकर लागणे थांबणार कधी असा सवाल वसईतील रेल्वे प्रवासी करत आहेत. एरव्ही रेल्वेच्या निष्क्रियतेबाबत आवाज उठवून प्रसिद्धी घेणाऱ्या प्रवासी संघटना कुठे आहेत ? असा सवाल प्रवाशांमधून व्यक्त होत आहे.ठिकठिकाणी हौसिंग सोसायट्या, सेवाभावी संस्था व नागरिकांनी स्वच्छतेसाठी पुढाकार घेतला. तर मग प्रवाशांच्या समस्यांसाठी पुढाकार घेतलेल्या संघटनांनी एकही स्थानक - लोकल का स्वच्छ केली नाही,असा सवाल सागर गिलाणकर या प्रवाशाने केला. रेल्वेच्या स्वच्छता विभागानेही सुरुवातीला स्वच्छतेबाबत सतर्कता दाखवली असली तरी स्वच्छतेत विशेष फरक पडलेला दिसत नाही. एकीकडे या सार्वजनिक स्वच्छतेबाबत चर्चा होत असतानाच रेल्वेमध्ये लागलेल्या स्टीकरबद्दलही प्रवाशांची ओरड आहे.झटपट नोकरी लावणार, चित्रपट क्षेत्रात काम मिळणार, बाबा बंगाली, कमी किंमतीत घरे-जमीन प्लॉट अशा जाहिराती करणारे स्टीकर सर्रास लागलेले आढळून येत आहेत. या स्टीकरमुळे ट्रेनचे विद्रुपीकरण होत असून रेल्वे पोलीस निद्रेत आहे का ? असा सवालही व्यक्त होत आहे. विशेषत: रात्रीच्या वेळेस ही स्टीकर ट्रेनमध्ये लावली जातात़ त्यावेळेस रेल्वे पोलिस काय करत असतात, असा प्रवाशांचा सवाल आहे. स्टीकर लावताना ते जप्त करून संबंधितांवर कारवाई केल्याचे रेल्वे पोलिसांचे म्हणणे असले तरी ही कारवाई नाममात्र असल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे. सध्या अस्वच्छतेबाबत चर्चा होत असतानाच लोकलसह लांबपल्याच्या गाड्याही चांगल्या स्वच्छ झाल्या पाहिजेत, अशी रेल्वे प्रवाशांची अपेक्षा आहे. त्याचप्रमाणे रेल्वे स्टेशन परिसरात थुंकणाऱ्या, अस्वच्छता करणाऱ्यांवरही कारवाई होत नाही. स्वच्छता अभियान सुरू झाल्यानंतर रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी रेल्वे स्थानकात पाहणी करण्यासाठी येणार असल्याने त्यावेळी एक-दोन दिवस स्टेशन स्वच्छ होतांना दिसतात, मात्र आता पुन्हा ‘जैसे थे’ परिस्थिती असल्याने प्रवासी हैराण आहेत. (प्रतिनिधी)
लोकलचा प्रवास नको रे बाप्पा
By admin | Updated: December 18, 2014 23:51 IST