वसई : अनधिकृत बांधकामाप्रकरणी बहुजन विकास आघाडीचे नालासोपारा पूर्वेकडील नगरसेवक अरुण जाधव यांचा अटकपूर्व जामीन फेटाळण्यात आल्यामुळे ते अडचणीत आले आहेत.अरुण जाधव हे बहुजन विकास आघाडीच्या बॅनरखाली निवडून आले आहेत. त्यांची भागिदारी असलेल्या स्पर्श डेव्हलपर्सने तुळींज येथील सर्वे क्र ९९ हिस्सा क्र.१ या जमिनीवर अनधिकृत इमारती उभारली होती. ही इमारत उभारण्यासाठी बोगस सातबारा उतारा, सी.सी., सिडको अॅप्रुव्हल प्लॅन, इंडेक्स आदी कागदपत्रांचा वापर करण्यात आला असल्याची तक्रार कुमार काकडे यांनी केली होती. या कागदपत्र्यांच्या आधारे अरुण जाधव यांनी फ्लॅट विक्री करून आणि दस्त नोंदणी करून शासनाची तसेच रहिवाशांची फसवणूक केल्याचेही काकडे यांनी तक्रारीत नमूद केले होते.काकडे यांनी दिलेल्या कागदपत्रांच्या आधारे महापालिकेने अरुण जाधव यांचे मयत वडील हरिश्ंचद्र जाधव यांच्यावर गुन्हाही दाखल केला होता. त्यानंतर आपल्यावरही कारवाई होण्याची शक्यता लक्षात घेवून अरुण जाधव यांनी अटकपूर्व जामीनासाठी वसई न्यायालयात अर्ज केला होता. मात्र, वसई कोर्टाने तो फेटाळून लावला. ही जागा हरिश्चंद्र काकडे यांनी स्पर्श डेव्हलपर्सला डेव्हलपमेंटसाठी दिली होती. २००७ साली अरुण जाधव यांनी या कंपनीतून निवृत्ती घेतली होती. त्यामुळे या बांधकामाशी त्यांचा संबंध नसल्याचा मुद्दा त्यांच्या वकीलांनी न्यायालयात मांडला होता. मात्र, तक्रारकर्त्याने २०१३ साली अरुण जाधव यांनी या इमारतीतील फ्लॅट विक्री केल्याचे बाब कोर्टाच्या निदर्शनास आणून दिली. (प्रतिनिधी)पोलीस म्हणतात अटक केल्यावर पत्रकारांना माहिती देऊतपासी अधिकाऱ्यांनी दिलेल्या कागदपत्रांवरूनही इमारत बांधण्यासाठी, त्यातील प्लॅट विकण्यासाठी बोगस कागदपत्रांचा वापर करण्यात आल्याचे न्यायालयापुढे निष्पन्न झाले. त्यामुळे या गुन्ह्यात अरुण जाधव सहभागी असल्याचे स्पष्ट झाले आहे. याप्रकरणी ताब्यात घेवून चौकशी करणे आवश्यक असल्यामुळे अर्जदार जामीनासाठी पात्र नसून, त्याचा अर्ज फेटाळण्यात आल्याचे आदेश न्या.एस.व्ही. भरुका यांनी दिले आहेत. याप्रकरणी तुळींज पोलीस ठाण्याचे निरिक्षक प्रकाश बिराजदार यांच्याशी संपर्क साधून अटकपुर्व जामीन नामंजूर केल्यामुळे अरुण जाधव यांना अटक करण्यात आले आहे का? याची माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता, त्यांना अटक केल्यावर तुम्हाला कळवू असे सांगितले. याप्रकरणामुळे बविआचे आणखी एक नगरसेवक अडचणीत आले आहेत. यापूर्वी नाना-नानी पार्क विरार येथील अनधिकृत बांधकामात भागिदारी असल्याप्रकरणी नगरसेवक नरेंद्र पाटील यांना अटक झाली होती.
नगरसेवक जाधवांचा जामीनअर्ज फेटाळला
By admin | Updated: April 14, 2016 00:41 IST