वाडा : तालुक्यातील चंद्रपाडा जोड रस्त्याचे काम सार्वजनिक बांधकम विभागाकडून करण्यात आले असून हे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाले असल्याची तक्रार ग्रामस्थांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उपअभियंत्यांकडे केली आहे.कोंढले खैरे मुख्य मार्गापासून चंद्रपाडा गावाला जाण्यासाठी शेता बांधावरून जावे लागत होते. गेली अनेक वर्षे येथील नागरीकांची रस्त्याची मागणी होती परंतु त्याकडे प्रशासन चाल ढकल करीत होते. या वर्षी ग्रामस्थांच्या प्रयत्नांना यश मिळाले आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने सुमारे १३ लाख १५ हजार रू. च्या निधीची तरतूद करून या रस्त्याच्या कामाला मंजूरी दिली.या रस्त्याच्या कामाचा ठेका जय प्रकाश मजूर कामगार सोसायटीला देण्यात आला आहे. या कामाकडे शाखा अभियंता सतिश मराडे याने दुर्लक्ष केल्याने ठेकेदाराने या कामामध्ये माती जास्त वापरली असून खडी देखील मातीमिश्रीत वापरली आहे. शिवाय सुरूवातीपासूनच लेअर देखील कमी वापरले गेले त्यामुळे हे काम अत्यंत निकृष्ट झाल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.या रस्त्यावर बी. बी. एम चे काम करताना डांबर मारते वेळी शाखा अभियंता गैरहजर राहील्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे. त्यामुळे ठेकेदाराने त्याचा फायदा घेत निकृष्ट दर्जाचे डांबर अल्प प्रमाणात वापरून वरचेवर काम उरकले त्यामुळे रस्त्याच्या कामाचा दर्जा घसरला त्यामुळे रस्त्याचे सरफेसींग अल्पावधीतच नष्ट होण्याची शक्यता गावकऱ्यांनी वर्तविली आहे. (वार्ताहर) स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच मिळाला रस्तास्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच या गावाला रस्ता मिळाला तोही निकृष्ट झाल्याने या रस्त्यासाठी वापरण्यात येणारे साहित्य माती, खडी, डांबर यांचे प्रयोग शाळेत परिक्षण बांधकाम विभागामार्फत करावे व दक्षता व गुणवत्ता नियंत्रण विभागाकडून या कामाची चौकशी झाल्याखेरीज संबंधीत ठेकेदाराला कोणत्याही प्रकारचे बील अदा करू नये अशी मागणी निवेदनात असून संबंधीत अधिकारी व ठेकेदारावर कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. या संदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता अरविंद कापडनिस यांच्याशी संपर्क साधला असता चौकशी करून कारवाई करणार असल्याचे त्यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.
निकृष्ट रस्त्याबाबत वाड्यामध्ये तक्रार
By admin | Updated: March 27, 2016 02:17 IST