हितेन नाईक, पालघरजशीजशी संक्रांत जवळ येते आहे तशीतशी आकाशातील पतंगांची संख्या वाढते आहे. गल्लीबोळात मांजा आणि पतंगींची दुकाने वाढू लागली आहेत. त्यावर चायनीज मांज्याचेच वर्चस्व असल्याने त्याच्या वाढत्या वापराने पशुपक्षी आणि मानव यांना धोका निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलिसांनी या मांजाचा साठा, विक्री, वितरण, वापर यावर बंदी घातली असून ते करताना आढळणाऱ्यांविरुद्ध गुन्हे दाखल केले जातील, असा इशारा दिला आहे.ही माहिती पोलीस उपअधीक्षक बजबळे यांनी लोकमतला दिली.भारतीय मांजा आणि चायनीज मांजा असे दोन मांजे काही वर्षांपूर्वी वापरले जात असत. परंतु कालांतराने चायनीज मांजाने भारतीय मांजाला पिछाडीवर टाकले. वास्तविक दोघांच्याही किंमतीत फारसा फरक नाही. तरीही मजबुती आणि पेच खेळतांना उपयोगात येणारी धार याबाबत चायनीज मांजा वरचढ असल्याने त्याला मागणी जास्त आहे. त्यामुळे त्याला पतंगशौकीन पसंती देतात. या मांजाने लढविलेला पेच प्रदीर्घकाळ टिकतो आणि तो वापरणारा पेच जिंकतो. असाही अनुभव असल्याचे पतंगबाज सांगतात. परंतु चायनीज मांजाचे दुष्परिणाम पक्षी आणि प्राणी तसेच मानव यांना भोगावे लागतात. त्यावर धातूची भुकटी अॅढेसीव्ह सोल्युशनमध्ये कालवून लावली जात असल्याने तीदेखील लवकर अथवा नष्ट होत नाही. त्याची धार अनेक महिने प्रसंगी वर्षे कायम राहते. त्याचा फटका पक्षी, प्राणी, झाडे, रोपे यांना बसतो.
चायनीज मांजाला चाप
By admin | Updated: January 8, 2016 01:59 IST