नालासोपारा : भांडणाचा राग मनात ठेवून चार जणांनी एका तरुण मित्राला दारू पाजून नंतर त्याची नायलॉनच्या दोरीने गळा आवळून हत्या केली. मृतदेह एका गोणीत भरून त्याची विल्हेवाट लावण्याचा कट असफल ठरला असून यातील एका आरोपीला पोलिसांनी अटक केली असून तीन जण फरार झाले आहेत. सुभाषचंद्र ऊर्फ भालू रामसागर गुप्ता (२१) असे त्याचे नाव असून तो प्रगतीनगरमध्ये दूध विकण्याचा व्यवसाय करायचा. त्यात त्याची आई त्याला मदत करते. काल संध्याकाळी सुभाषचंद्र गायब झाल्यानंतर शोधाशोध केली असता सुभाषचंद्रचा मृतदेह रवी डांगूर याच्या साईछाया इमारतीतील घरात एका गोणीत सापडून आला. त्यानंतर, सुभाषचंद्रची हत्या केल्याचे उजेडात आले. रवी डांगूर, शिवा भय्या, अभिजित मिश्रा आणि एक बंगाली या लोकांशी सुभाषचंद्रची मैत्री होती. या चौघांसोबत दोन दिवसांपूर्वी सुभाषचंद्रचे भांडण झाले होते. तो राग मनात ठेवून सुभाषचंद्रला ठार मारण्यात आले असावे, असा संशय सुभाषचंद्रचा भाऊ चंद्रशेखर गुप्ता याने तक्रारीत व्यक्त केला. याप्रकरणी तुळिंज पोलिसांनी एकाला अटक केली असून तीन जण फरार झाले आहेत. अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव पोलिसांनी उघड केले नसून आरोपीने चौघांनी मिळून सुभाषचंद्रला दारू पाजून नंतर त्याची नायलॉनच्या दोरीने गळा आवळून हत्या केल्याची माहिती दिली आहे. (प्रतिनिधी)
नालासोपाऱ्यात तरुणाची गळा आवळून हत्या
By admin | Updated: March 19, 2016 00:08 IST