कासा : डहाणू तालुक्यातील कासा भागात भातरोपण्या अंतिम टप्प्यात आहेत. पावसाच्या अनियमितपणामुळे शेतकऱ्यांची रोपणीची कामे लांबणीवर गेली असून वेळेवर पाऊस न झाल्याने काही शेतकऱ्यांना रोपे कमी पडल्याने शेती ओस पडली आहे.तालुक्यात गेल्या महिनाभरापूर्वीपासून शेतकऱ्यांनी भातरोपणीची कामे सुरू केली होती. मात्र, बरेच दिवस रोपणीच्या हंगामाच्या वेळी पावसाने उघडीप दिली होती. परिणामी, भातरोपणीसाठी पोषक असणाऱ्या चिखलयुक्त मातीअभावी शेतकऱ्यांच्या रोपण्या संथगतीने चालत होत्या. पाऊस कमी असल्याने बाहेरून मजूर आणणेही शेतकऱ्यांना परवडत नव्हते. त्यामुळे शेतकऱ्यांना थांबूनथांबून रोपणीची कामे करावी लागत होती. तसेच स्थानिक पातळीवर मजुरांचीही कमतरता भासते. त्यामुळे काही शेतकरी तीनचार माणसांना सोबत घेऊन रोपणी करताना दिसत होते.काही ठिकाणी घरातील मंडळीच याकामी जुंपलेली दिसत होती. तालुक्यातील कासा, वाणगाव, सायवन भागांत काही शेतकऱ्यांनी रोपण्या पूर्ण केल्या आहेत. (वार्ताहर)
कासा: भातरोपण्या अंतिम टप्प्यात
By admin | Updated: August 15, 2015 22:43 IST