पालघर : पालघर जिल्ह्यातील ३१५ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्जासोबत लागणाऱ्या जातीचे ना हरकत दाखल्यासाठी पालघर जिल्हाधिकारी कार्यालयात सकाळपासून आलेल्या उमेदवारांचे अर्ज दिवसभरात बनवून दिले जात नसल्याने एकच गोंधळ उडाला होता. जि. प. सदस्य प्रकाश निकम यांच्या प्रयत्नानंतर प्रशासनाने वाढीव मनुष्य बळाची सोय केल्यानंतर अनेक प्रकरणे मार्गी लागली.पालघर जिल्ह्यातील एकूण ४७० ग्रामपंचायती पैकी ३१५ ग्रामपंचायतीच्या निवडणुका १७ एप्रिल रोजी होणार असून नामनिर्देशनपत्र सादर करण्याची शेवटची तारीख २९ मार्च ते २ एप्रिल दरम्यान आहे. पालघर जिल्ह्यातील पालघर मधून (५६), वाड्यातुन (७०), वसईतुन (११), डहाणूतून (६२), तलासरी (१२), विक्रमगड (३६), जव्हार (४७), व मोखाडा (२१), अशा तालुकानिहाय ग्रामपंचायतीच्या निवडणुका होत आहेत. या ३१५ ग्रामपंचायतीपैकी अनेक ग्रामपंचायती पेसा अंतर्गत येत असल्याने त्यातील शंभर टक्के जागा आरक्षित राहणार आहेत. त्यामुळे निवडणुक लढवायची असेल तर उमेदवारी अर्ज दाखल करताना संबंधीत उमेदवाराला आपल्या अर्जासोबत जात प्रमाणपत्राची पडताळणी करून घेणे बंधनकारक ठरणार आहे. त्यासाठी संबंधीत तहसिलदाराकडून कागदपत्रे तपासणी करून आणल्यानंतर तसे नाहरकत प्रमाणपत्र जिल्हाधिकारी कार्यालयाकडून दिले जाते. त्यासाठी मागील आठवडाभरापासून विक्रमगड, जव्हार, मोखाडा, वाडा, तलासरी इ. ग्रामीण भागातून हजारो इच्छुक उमेदवार आपल्या गावातून पहाटे जिल्हाधिकारी कार्यालयात आपल्या फाईली जमा करून ठाण मांडून बसले होते. परंतु जिल्हाधिकारी कार्यालयात असणाऱ्या अपुऱ्या मनुष्यबळामुळे इच्छुक उमेदवारांना संध्याकाळपर्यंत पत्र मिळत नव्हते. त्यामुळे पहाटे आपल्या गावाहुन बस पकडून पालघर जिल्हाधिकारी कार्यालयात आल्यानंतर संध्याकाळी ७ वाजेपर्यंत पत्र मिळत नसल्याने माघारी घरी परत जाण्यासाठी एस.टी बस नसल्याने अनेकांची कुचंबना होणार होती. (प्रतिनिधी)
उमेदवारांची तारांबळ
By admin | Updated: March 26, 2016 02:41 IST