मनोर : या ग्रामपंचायतीच्या हद्दीत येणाऱ्या घरतपाडा येथील पाणीपुरवठा पंपाच्या मीटरचे बिल न भरल्याने वीजपुरवठा खंडित करण्यात आला असून एक हजार वस्ती असलेल्या या पाड्यातील महिलांना गेल्या पाच दिवसांपासून पाण्यासाठी मनोर-पालघर हायवे ओलांडून एक किलो मीटर पायपीट करावी लागते आहे. माजी सदस्य व ग्रामस्थांच्या तक्रारीला पंचायतीने केराची टोपली दाखविली आहे.महिलांना आपली कामे सोडून पाण्यासाठी एक किलो मीटर अंतरावर असलेल्या मनोर पालघर रस्त्यालगत असलेल्या विहिरीवरून पाणी भरावे लागत आहे. प्रत्येक महिन्याला ५५ रुपये घर पाणीपट्टी भरून सुद्धा मनोर ग्रामपंचायतीच्या हलगर्जीने २० हजार रुपयाचे विजबिल थकले आहे. मनोर ग्रामपंचायत कार्यालयात संजय घरत, दिलीप दांडेकर, चिंतामण घरत, संतोष खाडेकर व ग्रामस्थ जाऊन सरपंच संतोष माळी, ग्रामसेवक शिंदे यांची भेट घेऊन वरील विषयाबाबत सांगितले असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. ग्रामसेवक शिंदे यांनी सांगितले की, वीजबील भरणे आता शक्य नाही. (वार्ताहर)
वीज खंडित केल्याने पाण्यासाठी महिलांना ओलांडावा लागतो हायवे
By admin | Updated: February 29, 2016 01:39 IST