लोकमत न्यूज नेटवर्क पालघर : पालघर येथील पूर्व भागात असलेल्या वीरेंद्रनगरस्थित महेश वायर कंपनीतील एका कामगाराची मुलगी कंपनीतील पाण्याच्या उघड्या टाकीत पडून मृत्यू पावली आहे. उत्तरप्रदेशात राहणारे राकेश यादव हे कामगार असून कंपनीने तिथेच बनवलेल्या खोलीत कुटुंबासह राहत होते. मंगळवारी यादव हे दुपारी घरी जेवणासाठी आले असता त्यांना त्यांची ७ वर्षाची मुलगी प्रिया दिसली नाही तेव्हा त्यांनी त्यांच्या मुलांना व पत्नीला तिचा शोध घेण्यास सांगितले व ते कामाला निघून गेले. बरेच तास शोधून झाल्यावर प्रियाच्या मोठ्या भावाची कंपनीत बनवलेल्या पाण्याच्या टाकीवर नजर गेली व तेथील दृश्य पाहून त्याला धक्का बसला. त्या उघड्या पाण्याच्या टाकीत त्याच्या बहीणीचा मृतदेह तरंगत असताना त्याला दिसला. लागलीच त्याने मोठा आरडाओरड केली व त्याचे वडील राकेश यादवही घटनास्थळी पोहोचले तेथून त्यांनी प्रियाला त्या पाण्याच्या टाकीतून बाहेर काढले मात्र तोवर ती मृत पावली होती.घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. जाबजबाब व पंचनामा करून शव विच्छेदनासाठी पाठविले. या प्रकरणी पालघर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सुरु आहे. तर मुलीच्या नातेवाईकांनी कंपनीविरुद्ध निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल व्हावा अशी मागणी केलेली आहे.
पाण्याच्या टाकीत मुलाचा पालघरला मृत्यू
By admin | Updated: May 12, 2017 01:25 IST