पालघर/बोईसर : वसई-विरारनंतर बहुजन विकास आघाडीने बालेकिल्ला म्हणून घडविलेल्या बोईसरमधील त्या पक्षाचे आमदार विलास तरे यांनी रविवारी संध्याकाळी समर्थकांसह ‘मातोश्री’वर शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेत शिवसेनेत प्रवेश केला. पालघर लोकसभेची पोटनिवडणूक आणि नंतरच्या निवडणुकीत बहुजन विकास आघाडीला युतीने धक्का दिला. त्यानंतर विधानसभेच्या तोंडावर त्या पक्षाला हा मोठा हादरा मानला जातो.
तरे यांच्या जाण्याने पक्षाला काही फरक पडत नाही. ‘भगवान उसका भला करें’ अशी प्रतिक्रि या बविआचे अध्यक्ष आमदार हितेंद्र ठाकूर यांनी दिली. विलास तरे हे शिवसेनेकडून २००४ मध्ये ठाणे जिल्हा परिषदेवर निवडून गेले होते. त्यानंतर त्यांनी २००८ मध्ये बहुजन विकास आघाडीत प्रवेश केला. २००९ ते २०१९ या दहा वर्षांत अशा दोन वेळा ते हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीकडून विधानसभेवर निवडून गेले.सध्याची युतीची भक्कम स्थिती पाहता काही महिन्यांपासून ते शिवसेनेत प्रवेशासाठी इच्छुक होते. शिवसेनेतर्फे आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडेच सध्या ठाण्यासोबत पालघरचीही जबाबदारी आहे. या दोन्ही जिल्ह्यांतून सर्वाधिक आमदार निवडून आणण्यासाठी ते प्रयत्नशील आहेत. त्यातूनच तरे यांची घरवापसी झाल्याचे मानले जाते. यावेळी बोईसर पूर्व, वालीव भागातील तरे यांचे समर्थक हजर होते. या वेळी मंत्री एकनाथ शिंदे, शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर, जिल्हाध्यक्ष वसंत चव्हाण, राजेश शहा, तालुकाध्यक्ष विकास मोरे आदी मान्यवर उपस्थित होते.तत्पूर्वी विधानसभा अध्यक्ष हरीभाऊ बागडे यांची भेट घेत तरे यांनी आमदारकीचा राजीनामा देत तांत्रिक बाबींची पूर्तता केल्याचे सांगितले जाते.