हितेन नाईक, पालघरजिल्हा नियोजन समितीच्या निवडणुकीत नगरपालिका गटातून शिवसेनेचे अतुल पाठक यांच्या निसटत्या विजयाने सेनेमध्ये विजयाचे वातावरण पसरलेले असतानाच जिल्हा परिषद गटातील शिवसेनेचे ज्येष्ठ सदस्य प्रकाश निकम यांच्या पराभवाने हा उत्साह पुरता मावळला. काहीसे असेच चित्र मतमोजणीच्या दरम्यान राष्ट्रवादीच्या गोटातही पहावयास मिळाले. नगरपालिका गटातून मकरंद पाटील यांच्या पराभवाच्या धक्क्यात असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला जिल्हा परिषद गटात काशिनाथ चौधरी यांच्या विजयाने अपेक्षित (कि अनपेक्षित) सुखद धक्का दिला. सेनेचे निकम हे २०१४ मधील विधानसभा निवडणुकीतील विक्रमगड मतदारसंघाचे उमेदवार होते. त्यामुळे निकम यांचा हा पराभव निकम यांच्यासह विक्रमगड, जव्हार, मोखाडा तालुक्यातील सेना कार्यकर्त्यांच्या जिव्हारी लागला आहे. पराभवाच्या धक्कादायक निकालानंतर निकम यांनी थेट मातोश्रीवर धाव घेऊन त्याची प्रचिती आणून दिली. जिल्हा नियोजन समितीसाठी ३२ सदस्यांपैकी २३ सदस्य बिनविरोध निवडून आल्यानंतर उर्वरित ९ सदस्यांच्या निवडीसाठी मतदान होऊन जिल्हाधिकारी कार्यालयात आज सकाळी मतमोजणी पार पडली. नगरपालिका गटात राष्ट्रवादी विरुद्ध सेना असा सामना अपेक्षेप्रमाणे रंगला. मात्र नगरपालिका गटात पालघर, डहाणू, जव्हार अशी पालिकामधून २९ नगरसेवक तसेच मित्रपक्ष असलेल्या काँग्रेसच्या २ नगरसेविका मिळून ३१ नगरसेवक असतानाही २९ मते मिळवून सेनेचे उमेदवार अतुल पाठक हे विजयी झाले. याउलट राष्ट्रवादीच्या मकरंद पाटील यांना केवळ २८ च मते मिळाली. सेनेकडे २७ नगरसेवक असताना पाठक यांना २ मते अधिक मिळाल्याने राष्ट्रवादीला धक्का बसला. नगरपालिका गटात सेना २९ व राष्ट्रवादी २८ मते असे मोजणीनंतरचे चित्र असले तरी दोन्ही पक्षात फाटाफूट झाल्याची चर्चा आहे. पालघर पालिकेच्या काही नगरसेवकांनी राष्ट्रवादीला तर जव्हार डहाणू पालिकेतील राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी सेनेला मतदान केल्याची चर्चा आहे. पालिका गटानंतर महापालिका गटाच्या मतमोजणीतून अपेक्षित निकाल लागला. या गटात तीन जागांसाठी चार उमेदवार रिंगणात होते. सेनेचे धनंजय गावडे पराभूत झाले तर बविआचे उमेश नाईक, लॉरेल डायस, हार्दिक राऊत हे प्रत्येकी ३३ मते मिळवून विजयी झाले. जि.प. गटात पाच जागांसाठी सहा उमेदवार होते. यातील पाच युतीचे तर एक राष्ट्रवादीचा होता. ५७ मतदार असलेल्या या गटात ५१ मतदारांनी मतदान केले होते. दोन मते बाद ठरली अशोक भोये, कमलाकर दळवी, विजय खरपडे यांना प्रत्येकी ९ तर दिलीप गाटे यांना १० मते मिळवून ते विजयी झाले. तर सेनेचे प्रकाश निकम आणि राष्ट्रवादीचे काशिनाथ चौधरी यांना प्रत्येकी ६ मते मिळाल्याने चिठ्ठी काढण्यात आली असता प्रकाश निकम पराभूत झाल्याचे निवडणूक अधिकारी तावडे यांनी घोषित केले.
सेना-राष्ट्रवादीला फटका
By admin | Updated: March 10, 2016 01:40 IST