पालघर : पालघर जिल्ह्यामध्ये जास्तीत जास्त युवकांना कौशल्य विकास प्रशिक्षणाद्वारे जास्तीतजास्त रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी ५ कंपन्यांशी सामंजस्य करार केले. त्यामुळे जिल्ह्यातील ३ हजार व्यक्तींना रोजगार उपलब्ध होणार आहे.जिल्हाधिकारी कार्यालयात प्रमोद महाजन कौशल्य व उद्योजकता विकास अभियानांतर्गत पॉवर ग्रीड कॉर्पोरेशन आॅफ इंडीया लिमिटेड व इतर पाच कंपन्यासोबत हे करार करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर पॉवर ग्रीड कॉर्पोरेशन आॅफ इंडीयाचे महाव्यवस्थापक राजेश कुमार, जिल्हा कौशल्य विकास अधिकारी मुकेश संखे, जयंत प्रिंटरीचे प्रतिनिधी शशांक जैन यांच्यासह आरती ड्रग्ज लिमिटेड, डी.डेकॉर लिमिटेड, मंथना लिमिटेड, डी. बी. जी. क्लॉदींग लिमिटेड यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.जिल्हाधिकारी अभिजित बांगर म्हणाले की, सामाजिक दायित्वाच्या अंतर्गत ज्या कंपन्यांना समाजातील विविध घटकांसाठी काम करावयाचे आहे ते त्यांनी स्वतंत्ररित्या न करता जिल्हा प्रशासनामार्फत केल्यास ते अधिक प्रभावी होऊ शकते. त्याला वरील ५ कंपन्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. कौशल्य विकास कार्यक्रमांतर्गत रोजगार मेळावे घेण्यात आले व या मेळाव्यांना उमेदवारांचा, महिलांचा चांगला प्रतिसाद लाभला. त्यावेळी उमेदवार व महिलांनी प्रशिक्षणाची तसेच स्थानिक रोजगाराची मागणी केली होती. त्या उमेदवारांना शासनाने ठरविलेल्या क्षेत्रातील प्रशिक्षण देण्यासाठी निधीची आवश्यकता होती. याबाबत पॉवर ग्रीड कॉर्पोरेशन आॅफ इंडीया लिमिटेड या कंपनीशी संपर्क साधला असता तात्काळ त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. आणि आदिवासी व बिगर आदिवासी उमेदवारांच्या निवासी प्रशिक्षणाच्या खर्चासाठी ५० लाख रूपयांची प्रथम तरतूद उपलब्ध करून एकूण २ कोटी ची गुंतवणुकीची घोषणा केली. जिल्हा प्रशासन पॉवर ग्रीड कॉर्पोरेशन आॅफ इंडीया लिमिटेड आणि शासन यांच्यात याबाबतचा सामजंस्य करार करण्यात आला आहे.(वार्ताहर)
रोजगारासाठी पाच कंपन्यांशी करार
By admin | Updated: March 26, 2017 04:13 IST