विक्रमगड : पालघर जिल्ह्यात कुपोषणासोबत खरूजेसारख्या त्वचा विकारानेही थैमान घातले आहे. ही बाब श्रमजीवी संघटना आणि श्री विठूमाऊली चॅरिटेबल ट्रस्टच्यावतीने मलवाडा प्राथमिक आरोग्य केंद्रातील तपासणी शिबिरात निष्पन्न झाली. आज तपासणी झालेल्या १९६ बालकांपैकी ८७ बालके कुपोषित असल्याचे निष्पन्न झाले. पैकी १३ बालकांना तातडीच्या उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्याच्या सूचना डॉक्टरांनी दिल्या. येथील आदिवासी जनता आणि कुपोषित बालके आजही दुर्लक्षित असून कुपोषण हा रोग नसून हा भुकेचा आजार आहे असे सांगून सरकारने या भागातील भूक नष्ट करण्यासाठी पावले उचलायला हवीत अशी प्रतिक्रिया यावेळी विवेक पंडित यांनी पत्रकारांना दिली. आजच्या शिबिरात एक गोष्ट लक्षात आली की, व्हिसीडीसी बंद केल्यावर सरकार विरोधात श्रमजीवीेने अनेक आंदोलनं केलीत आणि त्यानंतर सरकारने बालकांसाठी अंडी, आणि केळी असा पूरक आहार सुरु केला, याचा परिणाम आज बालकांमध्ये दिसून आला. अनेक बालकांच्या प्रकृतीत काही अंशी सुधारणा झाली. हे आमच्या आंदोलनाचे यश असल्याचे पंडित यांनी सांगितले.गेले वर्षभर श्रमजीवी संघटना आणि विठूमाऊली ट्रस्ट पालघर जिल्ह्यातील विविध भागात कुपोषित बालकांची तपासणी करून त्यांना उपचार देण्याचा प्रयत्न करीत आहे. दुसऱ्या बाजूला श्रमाजीव संघटना सरकारसोबत या प्रश्नावर सतत संघर्ष करत आहे. सरकार मात्र अद्यापही कुपोषित बालकांसाठी काही सर्वसमावेशक उपाययोजना करतांना दिसत नाही. शिबिरात डॉ. आशिष भोसले, बालरोग तज्ञ डॉक्टर वर्षा भोसले यांनी बालकांना तपासले. यावेळी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.पटेल, प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.देवरे, डॉ. सिंग आणि त्यांचे सहकारी उपस्थित होते. आरोग्य सेवा देणाऱ्या आशिष आणि वर्षा भोसले यांचे कौतुक केले. यापुढे तज्ज्ञ डॉक्टर्सकडून मातांचीही आरोग्य तपासणी मोहीम हाती घेणार आहोत असे विवेक पंडित यांनी यावेळी सांगितले. या वेळी श्रमजीवी संघटनेचे विजय जाधव, कैलास तुंबडा, सुनील जाधव, मंगेश काळे आणि श्रमजीवी संघटनेचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. या ठिकाणी ज्योती निकाळजे, स्मिता साळुंखे, राहुल घरत, सविता ननोरे, दिनेश ननोरे, अॅड.शिल्पा सावंत - साळुंखे, विनायक साळुंखे किशोर जगताप हे उपस्थित होते. (वार्ताहर)
शिबिरात ८७ बालके कुपोषित
By admin | Updated: November 15, 2016 04:19 IST