Mumbai Ahmedabad National Highway Traffic: गेल्या काही महिन्यांपासून मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर होत असलेल्या वाहतूक कोंडीमुळे नागरिकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. गाड्या मध्येच बंद पडणे, मोठ्या प्रमाणात असलेले खड्डे, अवजड वाहनांमुळे होणारी कोंडी यामुळे महामार्गावर लांबच लांब रांगा लागलेल्या दिसत आहेत. आता ही वाहतूक कोंडी जीवघेणी ठरू लागलीय. गुरुवारी मुंबई अहमदाबाद महामार्गावर झालेल्या वाहतूक कोंडीमुळे एका दोन वर्षाच्या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. वाहतूक कोडींत मुलाला घेऊन जाणारी रुग्णवाहिका तब्बल पाच तास अडकल्यामुळे चिमुकल्याला जीव गमवावा लागला. या घटनेमुळे नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.
वसईत प्रशासनाच्या वाहतूक नियोजनातील हलगर्जीपणामुळे एका दोन वर्षाच्या चिमुरड्याचा जीव गेला. वसईच्या पेल्हार परिसरात राहणारा रियान शेख हा गुरुवारी दुपारी इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून खाली पडला होता. या अपघातात त्याच्या पोटाला गंभीर दुखापत झाली. त्यामुळे तातडीने त्याला जवळच्या गॅलेक्सी रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी प्राथमिक उपचार करून त्याला मोठ्या रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला दिला. त्यामुळे कुटुंबीय रियानला दुपारी २.३० च्या सुमारास रुग्णवाहिकेतून दुसऱ्या दवाखान्यात घेऊन निघाले होते.
मात्र मुंबईच्या दिशेने घेऊन जात असताना मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक कोंडीत रुग्णवाहिका अडकून पडली. पाच तास झाली तरी रुग्णवाहिका वाहतूक कोंडीतून बाहेर पडू शकली नाही. त्यातच रियानची प्रकृती ढासळली आणि त्याची हालचाल बंद झाली. त्यामुळे कुटुंबियांनी त्याला जवळच्याच ससूनवघर गावातील एका लहान रुग्णालयात नेले. मात्र, तेथील डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले. रियानच्या मृत्यूची बातमी कळताच कुटुंबियांना जबर धक्का बसला.
दरम्यान, या घटनेनंतर नागरिकांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे. गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून सातत्याने मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असल्याने लोकांमध्ये रोष निर्माण झाला आहे.