पालघर : बोईसरवरून पालघरकडे भरधाव वेगाने येणाऱ्या एस.टी बसने कोळगाव येथे एका मालवाहु ट्रकला दिलेल्या जोरदार धडकेत चालक वाहकासह चौदा प्रवासी जखमी झाले असून तीन लोक गंभीर जखमी झाल्याने त्यांना खाजगी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.बोईसरवरून प्रवासी भरून पालघरकडे येणारी यशवंत ही मिनी एस.टी बस कोळगाव येथे आली असताना एका वाहनाला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात समोरून येणाऱ्या मालवाहु ट्रकला धडकली. या अपघातात एस.टीचे चालक एस. बी. डोंगरे, वाहक एन. एम. बिन्नर व प्रवाशी आयुष घरत, रत्ना वाडेकर, आनंदी मोरे, नितीन भोये, अमृता चव्हाण, मणीलाल राजवंशी, नम्रता पाटील, मयुरी पाटील, आशा दवणे, दिया तरोणे, विभांगी मेहेर व शंकर मोरे हे प्रवाशी जखमी झाले आहेत. सध्या पालघर विभागांतर्गत मिनी बसेस खुपच भरधाव वेगाने हाकल्या जात असून या बसेसच्या चालकाच्या विरोधात अनेक तक्रारी पुढे येत आहेत. या अपघाताला जबाबदार असलेल्या मिनी एस.टी बस चाक डोंगरे विरोधात पालघर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदवला असून सर्व जखमींना पालघर एस.टी विभागाकडून तात्काळ आर्थिक मदत देण्यात आल्याची माहिती पालघर आगार व्यवस्थापक व्हि. एस. भंडारे यांनी दिली. (वार्ताहर)
कोळगाव येथे अपघातात १४ प्रवासी जखमी, ३ गंभीर
By admin | Updated: September 11, 2015 23:07 IST