पक्षश्रेष्ठींकडून कानउघाडणी : आपसात समन्वय राखण्याचे पदाधिकाऱ्यांना बजावलेवर्धा : जिल्हा परिषदेतील शिक्षक बदली आणि पदभरती घोटाळ्यात कोणताही पदाधिकारी अडकला तरी पक्ष यापुढे त्याची पाठराखण करणार नाही, यापुढे सर्व सभापतींनी आपसात समन्वय राखून वागावे, अशा शब्दात पक्षश्रेष्ठींनी गुरुवारी नागपुरात तातडीने बोलाविलेल्या जिल्ह्यातील भाजप पदाधिकारी, लोकप्रतिनिधी तसेच जि.प.पदाधिकारी व सदस्यांच्या बैठकीत ठणकावल्याची माहिती आहे.या बैठकीत निमंत्रित वर्धेच्या प्रत्येक जि. प. सदस्यांचे ‘वन टु वन’ म्हणणे ऐकून घेतले. यानंतर शेवटी पदाधिकाऱ्यांचा ‘क्लास’ घेतला. यामध्ये पदाधिकाऱ्यांमधील असमन्वयावरून चांगलीच कानउघाडणी केली. शिक्षण सभापती मिलिंद भेंडे आणि जि.प. सदस्य राणा रणनवरे यांच्यातील कलगीतुरा चांगलाच रंगला. यावेळी रणनवरे यांनी पुरावेच पक्षश्रेष्ठींसमोर सादर केल्याचे समजते. बैठकीच्या सरतेशेवटी सर्वांना समज देत जिल्हा परिषदेत गाजत असलेल्या घोटाळ्यात पक्ष कोणालाही जवळ करणार नाही. ज्यांच्यावर कार्यवाही होते. त्यामध्ये पक्षाचा पदाधिकारी असेल, तरीही पक्ष त्याला साथ देणार नाही, असेही यावेळी पक्षश्रेष्ठींनी ठणकावून सांगितल्याची माहिती पक्षातील सूत्राने ‘लोकमत’शी बोलताना दिली.दुपारी १२.१५ वाजता सुरु झालेली बैठक सायंकाळपर्यंत चालली. बैठकीला भाजपचे संघटन मंत्री डॉ. उपेंद्र कोठेकर, खा. रामदास तडस, भाजपचे वर्धा जिल्हाध्यक्ष डॉ. शिरीष गोडे, आ. पंकज भोयर, माजी आमदार दादारावे केचे प्रामुख्याने उपस्थित होते. बैठकीत अंतर्गत कलह पुढे आल्यामुळे सीईओ बदलण्याचा विषय बाजुला पडल्याची माहिती आहे.(जिल्हा प्रतिनिधी)
जि.प. पदभरती, शिक्षक बदली घोटाळ्यात भाजपचे हात वर
By admin | Updated: August 28, 2015 02:11 IST