छत्रपतींचा जयजयकार : ठिकठिकाणी मिरवणुकांसह विविध कार्यक्रमवर्धा : जय शिवाजी.. जय भवानी.., छत्रपती शिवाजी महाराज की जय... अशा जयघोषात वर्धेकरांनी शिवरायांना मानाचा मुजरा केला. रविवारी छत्रपतींची जयंती तारखेनुसार साजरी करण्यात आली. यावेळी वर्धेतील मुख्य मार्गावर असलेल्या शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्याजवळ शिवभक्तांची चांगलीच गर्दी झाली होती. प्रत्येकाच्या तोंडी छत्रपतींचा जयजयकारच असल्याचे दिसून आले. छत्रपती शिवारायांच्या जयंतीनिमित्त जिल्ह्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सकाळपासूनच शहरातील विविध भागातून भगव्या पताका खांद्यावर आणि शिवरांची प्रतिमा घेत भव्य मिरवणुका काढण्यात आल्या. सर्वच मिरवणुका मुख्य मार्गावर येत शिवाजी चौक परिसरात विसर्जित झाल्या. यावेळी अनेकांनी शिवारांना माल्यार्पण करीत जयघोष केला. सकाळी वर्धेचे नगराध्यक्ष अतुल तराळे यांनी शिवाजी चौक परिसरात असलेल्या छत्रपतींच्या पुतळ्याला माल्यार्पण केले. यावेळी मुख्याधिकारी अश्विनी वाघमळे यांच्यासह कर्मचाऱ्यांनी उपस्थिती होती. शिवजयंती निमित्त वर्धेतील शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याची रोषणाईसह सजावट करण्यात आली होती. येथे वर्धेतील शिवभक्तांनी शिवरायांना मुजरा करण्याकरिता एकच गर्दी केल्याचे दिसून आले. शिवाजी चौकात येणाऱ्या शिवभक्तांना कोणताही त्रास होणार नाही याकरिता शिवाजी चौक मित्र परिवाराच्यावतीने थंड पाण्याची सोय केली होती. तर हा मुख्य मार्ग असल्याने येथे वाहतुकीचा खोडा होणार नाही याची जबाबदारी वाहतूक पोलिसांनी पार पाडली. हिंगणघाट येथे शिवचरित्र अभ्यासक यांचे छत्रपती शिवरायांनी शेतकरी हितार्थ राबविलेल्या विविध योजना या विषयावर व्याख्यानाचे आयोजन होते. तर विदर्भ राज्य आघाडीच्यावतीने विदर्भ राज्य आघाडीतर्फे सकाळी ८ वाजता नंदोरी चौकातून मोटरसायकल रॅली निघाली. जयंतीनिमित्त डॉ. आंबेडकर विद्यालयाच्या सभागृहात किल्ले प्रतिकृती स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत अनेकांनी शिवरायांच्या विविध गडांच्या प्रतिकृती तयार केल्या. यानंतर सायंकाळी नंदोरी चौकातून शोभायात्रा निघाली. यात विविध झाक्यांचा समावेश होता. शिवजयंती निमित्त जिल्ह्यात विविध ठिकाणी रक्तदानही झाले. यात आचार्य विनोबा भावे रुग्णालयासह सेवाग्राम रुग्णालयाच्यावतीने रक्तसंकलन करण्यात आले. तसेच शिवजयंती उत्सव समितीच्यावतीने घोराड येथे मतिमंद विद्यालयात एक घास आपुलकीचा हा कार्यक्रम राबविण्यात आला.(प्रतिनिधी) मिरवणुकांनी दुमदुमले शहर सायंकाळी युवा सोशल फोरम आणि शंभुराजे सोशन आॅर्गनायझेशनच्यावतीने शोभायात्रा आयोजित करण्यात आली होती. या शोभायात्रेत विविध झाक्यांचा समावेश होता. समोर भगवी पतका पाठीवर घेतलेला अश्व, त्यामागे बँड पथक आणि पथकामागे शिवभक्तांची गर्दी. या गर्दीत शिवराय, माँ साहेब जिजाऊ आणि मावळ्यांची वेषभूषा केलेले युवक साऱ्यांचे आकर्षण ठरले. ही शोभायात्रा रामनगर येथील युवा सोशल फोरमच्या चौकातून निघून शहरातील मुख्य मार्गावर येत छत्रपती शिवाजी महारात चौकात विसर्जित झाली. या शोभायात्रेसह आचार्य विनोबा भावे रुग्णालयाच्यावतीनेही एक शोभायात्रा काढण्यात आली. ही शोभायात्रा रुग्णालय परिसरातून निघून बजाच चौक मार्गे शिवाजी चौकात विसर्जित झाली. या शौभायात्रेत करण्यात आलेली रोषणाई आणि आतिषबाजी नागरिकांचे आकर्षण ठरली. दोनही मिरवणुकीत सहभागी शिवभक्तांकरिता वर्धेच्या मुख्य मार्गावर अनेकांनी पाण्याची व्यवस्था केल्याचे दिसून आले. सकाळी वर्धा शहरातून क्षत्रिय मराठा संघटनेच्यावतीने मिरवणुकीत काढण्यात आली. या मिरवणुकीत भगवे फेटे घातलेल्या महिला विशेष आकर्षण ठरल्या. तसेच शनिमंदिर चौकातून शिवगर्जना ढोल पथकाच्यावतीने मिरवणूक काढण्यात आली. शहरातील विविध भागातून अशा मिरवणुका काढण्यात आल्या. यात संभाजी ब्रिगेड, जिजाऊ ब्रिगेड, मराठा सेवा संघ, शिवराज्य ग्रुपच्यावतीने मिरवणुका काढण्यात आल्या.
वर्धेकरांचा शिवरायांना मानाचा मुजरा
By admin | Updated: February 20, 2017 01:07 IST