वर्धा : वीज ग्राहक आणि कर्मचाऱ्यांमध्ये विद्युत सुरक्षेप्रती जागरुकता निर्माण व्हावी, याकरिता कार्यशाळा घेण्यात आली. या कार्यशाळेतून ग्राहकांना अपघात विरहीत वीज पुरवठा उपलब्ध व्हावा, यासाठी राज्य शासनाच्या उद्योग, ऊर्जा व कामगार विभागातर्फे वीज सुरक्षा सप्ताह राबविण्यात आला. भुगाव येथील उत्तम कंपनी आणि विद्युत निरीक्षक कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यशाळेला महावितरणचे अधीक्षक अभियंता सुनील देशपांडे, कार्यकारी अभियंता अविनाश काकडे यांची उपस्थिती होती. कार्यशाळेत उदय भोयर यांनी इलेक्ट्रीक कामातील मालक पध्दती या विषयावर सादरीकरण करताना ३३ केव्ही उपकेंद्रे, ११ केव्ही वाहिन्या, लघुदाब वाहिन्या यांच्या उभारणीसंबंधी तसेच त्यामध्ये आवश्यक असणारे सुरक्षीत अंतर याची माहिती दिली. विद्युत अपघाताची कारणे व उपाययोजनांवर इंगळे यांनी मार्गदर्शन केले. विविध प्रकारच्या अपघातांच्या शक्यतेबद्दल माहिती देत घ्यावयाची काळजी, सुरक्षा साधनांचा योग्य वापर, त्याची देखभाल याविषयी कर्मचाऱ्यांना अवगत केले. कार्यशाळेच्या दुसऱ्या सत्रात वैद्यकीय अधिकारी बेले यांनी विद्युत धक्का लागल्यास करावयाच्या प्राथमिक उपचारांची माहिती दिली. कृत्रिम श्वासोच्छश्वासाचे प्रात्याक्षिक दिले. तर भुते यांनी आग विझविण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या अग्निशमन यंत्राची कार्यपध्दती सांगितली.(स्थानिक प्रतिनिधी)
विजेच्या सुरक्षित वापराबाबत कार्यशाळेतून माहिती
By admin | Updated: January 19, 2017 00:37 IST