लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : वर्धा ते नागपूर, वर्धा ते भुसावळ आणि सेवाग्राम ते बल्लारशाह असा तिसरा आणि चौथ्या रेल्वे मार्गाबाबत प्रकल्पाची प्रगती आणि आतापर्यंत या प्रकल्पासाठी निधी वाटप तपशील, तसेच रेल्वे मार्ग कधीपर्यंत पूर्ण होणार याबाबत खासदार रामदास तडस यांनी लोकसभेमध्ये तारांकित प्रश्न संख्या २४० अंतर्गत प्रश्न उपस्थित करून लोकसभेचे लक्ष वेधले. या प्रश्नाला उत्तर देताना केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्पष्ट केले की, वर्धा-नागपूर ३ री लाइन (७६ किमी) २०१२-१३ मध्ये मंजूर प्रकल्प. प्रकल्पाची अपेक्षित किंमत रु. ५४० कोटी आहे. मार्च २०२१ पर्यंत रु. ३६२ कोटींचा खर्च झाला आहे आणि २०२१-२२ साठी रु. ४६ कोटींचा परिव्यय प्रदान करण्यात आला आहे. वर्धा-नागपूर ४ थी लाईन (७९ किमी) २०१६-१७ मध्ये मंजूर प्रकल्प. प्रकल्पाची अपेक्षित किंमत रु. ६३८ कोटी आहे. मार्च, २०२१ पर्यंत रु.२४८ कोटींचा खर्च झाला आहे आणि२०२१-२२ साठी रु. १४८ कोटी खर्चाची तरतूद करण्यात आली आहे. वर्धा-नागपूर तिसऱ्या आणि चैथ्या मार्गासाठी ४१ हेक्टर जमिनीपैकी १० हेक्टर जमीन संपादित करण्यात आली आहे. वर्धा-नागपूर प्रकल्पाच्या तिसऱ्या आणि चौथ्या लाइनचा बुटीबोरी-सिंदी (१९ किमी) विभाग कार्यान्वित झाला आहे आणि उपलब्ध जमिनीत उर्वरित लांबीची कामे हाती घेण्यात आली आहेत. वर्धा-भुसावळ (३१३ किमी) वर्धा ते भुसावळ या तिसऱ्या लाइनच्या कामाचा समावेश शासनाच्या आवश्यक मान्यतेच्या अधीन राहून अर्थसंकल्पात करण्यात आला आहे. सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. वर्धा-नागपूर तिसरी लाइन व चौथी लाइन, वर्धा-भुसावळ ३ री लाइन व वर्धा-बल्लारशाह तिसरी लाइन रेल्वे प्रकल्प कालबद्ध वेळेत पूर्ण व्हावा यासाठी प्रयत्न सुरू आहेत. असे खा. तडस यांनी म्हटले आहे.अनेक प्रकल्पाला सन २०१५-१६ खऱ्या अर्थाने प्रारंभ व गती प्रदान झाली आहे. काही प्रकल्प पूर्ण करीत असताना राज्य सरकारकडून जलद भूसंपादन, वन विभागाच्या अधिकाऱ्यांकडून वन मंजुरी यामुळे प्रकल्प पूर्ण करण्यास अडचण निर्माण होत आहे. केंद्र सरकार हे प्रकल्प लवकरच पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून सकारात्मक आहे, जिल्ह्याशी संबधीत हे तीनही प्रकल्प लवकरच पूर्ण होऊन लोकांच्या सेवेत दाखल होईल, असा विश्वास खासदार रामदास तडस यांनी व्यक्त केला.
राज्य सरकारमुळे काम रखडले
nवर्धा-बल्लारशाह तिसरी लाइन (१३२ किमी)२०१५-१६ मध्ये मंजूर प्रकल्प. प्रकल्पाची अपेक्षित किंमत रु. १२७२ कोटी आहे. मार्च,२०२१ पर्यंत रु. ४३२ कोटींचा खर्च झाला आहे आणि २०२१-२२ साठी रु. १४६ कोटी खर्चाची तरतूद करण्यात आली आहे. १३० हेक्टर जमिनीपैकी ६६ हेक्टर जमीन संपादित करण्यात आली आहे. उपलब्ध जागेत मातीकाम, मोठे पूल व किरकोळ पुलांचे काम हाती घेण्यात आले आहे. कोणताही रेल्वे प्रकल्प पूर्ण करणे हे राज्य सरकारकडूनजलद भूसंपादन, वन विभागाच्या अधिकाऱ्यांकडून वन मंजुरी, प्रकल्पाचे प्राधान्य, उल्लंघन करणाऱ्या युटिलिटीजचे स्थलांतर, विविध प्राधिकरणांकडून वैधानिक मंजुरी, भूगर्भीय आणि भौगोलिक परिस्थिती यासारख्या विविध घटकांवर अवलंबून असते. प्रकल्पाच्या जागेचे क्षेत्रफळ, कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती इ. हे सर्व घटक प्रकल्प पूर्ण होण्याच्या वेळेवर परिणाम करतात. यामुळे प्रकल्पाचे पूर्ण होण्याची पुष्टी केलेली वेळ निश्चित केली जाऊ शकत नाही. तरीही प्रकल्पाचे काम जलदगतीने पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केले जात आहे.