वर्धा : आष्टी येथील किशोर गणपत सोनोने यांचे २३ जानेवारी २०१४ रोजी अपघाती निधन झाले. मृत्यूनंतर त्यांच्या राहत्या घरी पत्नी व मुलास दीर आणि त्याच्या पत्नीने मारहाण करून तसेच धमकावून अत्यल्प किमतीत घर ताब्यात घेतले. तसेच अजूनही वारंवार धमकावणे सुरू असल्याची तक्रार पीडित विवाहिता रेखा किशोर सोनोने यांनी पोलीस अधीक्षकांना निवेदनाद्वारे केली आहे. मारहाणप्रकरणी आष्टी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल असून प्रकरण आष्टी न्यायप्रविष्ठ आहे. निवेदनानुसार, रेखा सोनोने रा. आष्टी, जि. वर्धा हिचे पती किशोर सोनोने यांचे २३ जानेवारी २०१४ रोजी अपघाती निधन झाले. त्यांना तपीश हा मुलगा असून रेखा व तपीश दोघे घरी असतात. परंतु रेखाचे दीर जीवन सोनोने आणि जाऊ संगीता सोनोने यांनी घर बळकवण्यासाठी दबाव आणला. तसेच २६ मे २०१४ रोजी रेखा ही तिच्या माहेरी असताना तिला व तिच्या आईला दोघांनीही येऊन जबर मारहाण केली. यात रेखाच्या डोक्याला जबर दुखापत होऊन ती नागपूरला मेडिकलमध्ये दाखलही होती. जीवन आणि संगिता या दोघांनीही मिळून किशोरच्या नावावर असलेले घर आपल्यावर मानसिक दबाब टाकून अत्यल्प किमतीत बळकावल्याचा आरोप रेखाने निवेदनात केला आहे. तसेच या दोघांविरोधात तक्रार दाखल केल्यामुळे आपल्याला सतत धमकावणे सुरू असल्याचाही आरोप करण्यात आला आहे. तसेच अनेक दिवसांपासून हा प्रकार सुरू असल्याने नाहक त्रास सहन करावा लागत असल्याचेही निवेदनात नमूद आहे.त्याचप्रकारे वचपा काढण्यासाठी जीवन सोनोने याने सासू कौसाबाई सोनोने यांच्या नावाने आर्वीचे उपविभागीय अधिकारी यांच्याकडे किशोर सोनोनेचा अपघात नसून रेखाने त्याचा खून केल्याची तक्रार दाखल केली. परंतु हा आरोप पूर्णत: खोटा असून आपल्याला त्रास देण्यासाठीच हा बनाव रचल्या गेल्याचे निवेदनात नमूद आहे.माझ्या व मुलाच्या जीवितास धोका असून संबंधितांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी रेखा सोनोने यांनी पोलीस अधीक्षकांना निवेदनाद्वारे केली आहे. तसेच निवेदनाच्या प्रती उपविभागीय पोलीस अधिकारी आर्वी तसेच पोलीस निरीक्षक आष्टी यांनाही देण्यात येऊन कारवाईची मागणी करण्यात येत आहे.(शहर प्रतिनिधी)
घर बळकावण्यासाठी महिलेस बेदम मारहाण
By admin | Updated: November 25, 2014 23:01 IST