पुण्याची चमू दाखल : हिंगणघाट व पुलगाव शहरात तपासणी; उच्चाटनाकरिता नागरिकांचे सहकार्य गरजेचेवर्धा : डेंग्यूचा आजार हा एडीस नामक डासाच्या दंशाने होतो, हे आता सर्वसामान्यांना माहिती झाले आहे. हा डास साचलेल्या पाण्यात निर्माण होतो हेही माहिती आहे. या डासाची अंडी पाण्यात असतात. पाणी संपताच ते टाण्याच्या अथवा टाकीच्या भिंतीला चिपकतात. पाण्याच्या या भांड्यात पाणी नसले तरी ही अंडी भिंतीला चिपकून वर्षभर जिवंत राहू शकतात, असा खुलासा पुणे येथील राष्ट्रीय विषाणू संस्थेचे किटकशास्त्र तज्ज्ञ डॉ. महेंद्र जगताप यांनी ‘लोकमत’शी बोलताना केला. जिल्ह्यात सध्या डेंग्यूने थैमान घाते आहे. जिल्ह्यात आजघडीला १०२ रुग्ण आहेत. या रोगावर प्रतिबंध लावण्याकरिता जिल्हा आरोग्य विभागाच्यावतीने विविध उपाययोजना आखण्यात येत आहे. मात्र त्यांच्या हाती अपयशच येत आहे. या उपाययोजनांतर्गत शुक्रवारी जिल्ह्यात पुणे येथील पुणे येथील किटकशास्त्र तज्ज्ञांची चमू दाखल झाली होती. या चमूने जिल्ह्यातील हिंगणघाट तालुक्यातील आजंती या गावात व पुलगाव शहराची पाहणी केली. या तपासणीत त्यांनी गोळा केलेले नमुने पुणे येथील प्रयोगशाळेत नेवून त्याचा अभ्यास करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. शिवाय यावेळी आरोग्य विभागाच्यावतीने करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची पाहणी केली.गत वर्षीच्या तुलनेत यंदा केवळ वर्धेतच नाही तर राज्यात डेंग्यूच्या रुग्णात वाढ होत आहे. शिवाय डासांपासून होत असलेल्या विविध रोगाची लक्षणे बदलत असल्याचे समोर आले. ही चमू याचाच अभ्यास करण्याकरिता जिल्ह्यात डेंग्यू या रोगाकरिता कारण ठरत असलेल्या ‘एडीस’ या डासासह पाण्यात वाढत असलेल्या डासांच्या अळीचे नमुने गोळा करीत आहे. वर्धेत सकाळी दाखल झालेल्या या चमूचे किटकशास्त्र तज्ज्ञ डॉ. महेंद्र जगताप यांच्या मार्गदर्शनात जिल्ह्यातील आजंती व पुलगाव शहरात तपासणी करून त्याचे नमूने गोळा केले. या दोन गावात असलेल्या डासांची व डासअळीची घणता तपासण्याकरिता हे नमुने घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले आहे. शिवाय जिल्हा आरोग्य विभागाच्यावतीने राबविण्यात येत असलेल्या उपायोजनांचीही पाहणी केली. जिल्ह्याच्यावतीने करण्यात येत असलेल्या उपाययोजनांबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले असले तरी यात सातत्य ठेवण्याच्यासूचना आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांना केल्यात. शिवाय नागरिकांत जनजागृती निर्माण करण्याकरिता सामाजिक संस्थांचा सहभाग घेण्याच्या सूचना केल्यात. जिल्ह्यातील गावात तपासणी करताना आरोग्य विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
पाण्याशिवाय वर्षभर जगतात ‘एडीस’ची अंडी
By admin | Updated: September 20, 2014 01:43 IST