शासनाकडून दुर्लक्ष : मातंग समाजबांधवांचा आरोपआष्टी (शहीद) : समाजाच्या उत्थानासाठी आयुष्य खर्ची घालणारे तथा आपल्या प्रभावी लेखनीतून समाजभान जागृत करणारे, दुर्बल घटकांसाठी साहित्य व कर्तृत्वातून आवाज उठविणारे थोर थोर साहित्यिक लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याला दरवर्षी हार घालून जयंती साजरी केल्या जाते. मात्र त्यांच्या स्मारक निर्मितीकरिता शासनाला अद्यापही मुहूर्त मिळालेला नाही. अनेक वर्षापासून येथे संरक्षण भिंत नाही. सौंदर्यीकरणाची प्रतीक्षा आहे. यामुळे संतप्त झालेल्या मातंग समाज बांधवांनी लोकशाहीरांच्या स्मारकाचा मुहुर्त कधी अशी विचारणा शासनाकडे केली आहे. अण्णाभाऊ साठे हे नाव जनमानसात लोकप्रिय आहे. तत्कालीन मागासलेल्या समाजाची व अस्पृश्यांच्या व्यथा फकीरा या कादंबरीमधून त्यांनी मांडली. फकीरा प्रभावीपणे उभा केला मात्र आज त्याच लोकशाहीराला उन, वारा, पाऊस या तिन्हीचा सामना करावा लागत आहे. अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याला हक्काचे संरक्षण नसावे ही प्रशासनातील आंधळेपणाची बाब ठरत आहे. राज्यमार्गाला लागून असलेल्या प्रशस्त जागेवर काही वर्षापूर्वी अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा उभारण्यात आला. वर्षभरात येथे दोनदा कार्यक्रम आयोजित केल्या जातो. जयंती आणि पुण्यतिथी कार्यक्रमाला मातंग समाज बांधवांसह पुढारी येतात. आश्वासनाची खैरात वाटली जाते. मात्र पुढील कार्यवाही होत नाही. हा प्रकार वर्षानुवर्षे सुरू आहे. त्यासाठी पुढाकाराची गजर व्यक्त होत आहे. अण्णाभाऊ साठेंच्या पुतळ्या भोवती असलेले तारांचे कुंपण तुटले आहे. लोखंडी गेट चोरीला गेले, परिसरात घाणीचे साम्राज्य आहे. येथे विकासकामाची गरज आहे. मानवतेच्या महामानवाला समस्यांच्या गर्गेतून बाहेर काढा अन्यथा आंदोलक पवित्रा घेऊ अशा प्रतिक्रीया मातंग समाजबांधवांनी व्यक्त केल्या.(तालुका प्रतिनिधी)
लोकशाहिरांच्या स्मारकाचा मुहूर्त कधी?
By admin | Updated: November 16, 2016 00:52 IST