वर्धा : सातत्याने वाढणारे वायू प्रदुषण, विषाणू व जीवाणूचे संक्रमण यामुळे थ्रोट इन्फेक्शन वाढण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यात लहान मुलांपासून तर ज्येष्ठांपर्यतच्या रुग्णांचा समावेश आहे. त्यामुळे कोणताही पदार्थ गिळताना त्रास होत असेल, घसा दुखत असेल किंवा खवखवत असेल, तर वेळीच तज्ज्ञांना दाखवून उपचार घ्यावा, असा सल्ला कान, नाक, घसारोग तज्ज्ञांकडून दिला जातो.
कारण काय ?
- व्हायरल किंवा संसर्ग : विषाणू, जिवाणू संसर्ग तसेच व्हायरल इन्फेक्शनमुळे घसा संदर्भातील समस्या जाणवू शकतात. यासोबतच धूळ, धूर आणि इतर हानीकारक वायू प्रदुषणामुळे घसा खवखवू शकतो.
- अनुवांशिक घटक : अनुवांशिक घटक आणि कमकुवत प्रतिकार शक्तीमुळे काही लोकांमध्ये वारंवार स्ट्रेप थ्रोट होण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे सातत्याने असा त्रास होत असेल तर तज्ज्ञ डॉक्टरांना दाखवून उपचार करुन घेणे गरजेचे आहे.
- मद्यपान आणि धूम्रपान : तंबाखू, मद्यपान, धूम्रपान आणि मसालेदार पदार्थांमुळे अनेकांना घशात जळजळ होऊ शकते किंवा समस्या जाणवू शकतात. त्यामुळे व्यसन टाळणे आरोग्याच्या दृष्टीने गरजेचे आहे.
काय काळजी घ्याल?
- गरम पाण्याच्या गुळण्या करा : जर घसा दुखत असेल, खवखवत असेल तर गरम पाण्याने गुळण्या कराव्या.
- डॉक्टरांचा वेळीच सल्ला घ्या : व्हायरल इन्फेक्शनमुळे घसा दुखत असेल तर दोन ते तीन दिवसांत आपोआप बरा होतो. मात्र, तीव्र वेदना आणि गिळण्यास त्रास होत असेल आणि त्रास तीन दिवसांपेक्षा अधिक काळ असल्यास डॉक्टरांना दाखवून उपचार घ्यावा.
"थ्रोट इन्फेक्शन विविध कारणांनी होऊ शकते. त्यामुळे काळजी घेणे गरजचे आहे. मात्र, घसा दुखणे, खवखवणे, गिळताना त्रास होत असेल, तर जास्त काळ वाट न पाहता तज्ज्ञांना दाखवून उपचार करून घ्यावा, अन्यथा समस्या वाढू शकते."- डॉ. रोशन शेंडे, वर्धा.