बा.दे. अभियांत्रिकीतील विद्यार्थ्यांचा प्रयोग : सौर उर्जेवर आधारित यंत्रसामुग्री केली विकसित लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : अद्यावत तंत्रज्ञानाची पाळेमुळे कृषीक्षेत्रात रुजली तरच शेती आणि पर्यायाने शेतकरी समृध्द होवू शकतो. या बाबीला समोर ठेवून बा.दे. अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या इलेक्ट्रीकल इंजि. शाखेतील विद्यार्थ्यांनी सौर प्रभावी शेती करण्याची पद्धत विकसित केली. सौर उर्जा व वीजप्रवाहावर कार्य करणारे वॉटर सप्लॉय, क्रॉप कटींग, सॉईल कल्टीवेशन, स्प्रे अॅण्ड करंट प्रोटेक्शन ही कामे सर्व कामे करणारे यंत्र विकसीत केले. एकच व्यक्ती सदर यत्र हाताळू शकतो. यामुळे पाण्याची, मजुरीवरील खर्चाची आणि वेळेची जवळपास ७० टक्के बचत करता येणे शक्य होणार आहे. अंतिम वर्षातील ऋतुजा कदम, योगेश पांडे, पायल दरणे, रोहीत ठवकार, अक्षय रांखुडे, सुयेश भुसारी, रूपाली रांगे या विद्यार्थ्यांनी प्रकल्पाचे मार्गदर्शक प्रा. स्वप्नील देशमुख यांच्या मार्गदर्शनात सदर यंत्र तयार केले. यंत्राची क्षमता जाणुन घेण्याकरिता चाचणी घेण्यात आली. सध्या शेती आणि शेतकरी हा विषय अतिशय संवेदशील आहे. नापिकी, नैसर्गिक संकट, पिकांवर विविध रोगांचा प्रार्दुभाव अशा समस्येच्या गर्तेत शेतकरी कायम भरडल्या जातो. तंत्रज्ञानाने जरी उत्तुंग भरारी घेतली तरी ग्रामीण भागापर्ययत विशेषत: कृषीक्षेत्रात अद्यावत तंत्रज्ञान पोहचत नसल्याचे दिसून येते. याकरिता महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सदर प्रयोग केला. या अभिनव प्रकल्पाविषयी बोलताना प्रा. स्वप्नील देशमुख म्हणाले की, पाणी व्यवस्थापन करताना आम्ही एका आवश्यक उंचीवर पाण्याची टाकी ठेवून पिकांना गरजेचे तेवढेच पाणी पुरविण्याची पध्दत विकसित केली आहे. ही पध्दत ड्रिपपेक्षाही प्रभावी आहे. ड्रिप मध्ये २ लिटर प्रमाणे दिवसाला ४८ तास पाणी लागते. या पध्दतीत केवळ ५ लिटर पाणी लागणार आहे. तसेच निंदण, सवंगणी याकरिता मजुरांची गरज असते. या यंत्राच्या माध्यमातून ही कामे करता येणार आहे. हायड्रोलिक यंत्राचा वापर शेतीत होवू लागला आहे. याला सौर ऊर्जेची जोड दिल्याने वेळेची मोठी बचत होणार आहे. स्प्रे युनीट आणि फेन्सींगची नवी पध्दत विकसित केली आहे. पाठीवर स्प्रे पंप घेवून फवारणी टाळून ड्रिपच्या माध्यमातून फवारणी शक्य होणार आहे. शिवाय श्वापदांमुळे होणारी पिकांची नासाडी टाळण्यासाठी पल्स एसीची किट बनविली आहे. यामुळे मानवी जीवितहानी होणार नाही. केवळ प्राण्यांना करंट लागेल. ही सर्व यंत्रणा एकाच मोटरवर बसविली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक बचत होईल, असा विश्वास प्रा. देशमुख यांनी व्यक्त केला. संचालक समीर देशमुख, प्राचार्य डॉ. एम. गायकवाड, विभागप्रमुख डॉ. श्रीवास्तव यांनी मार्गदर्शन केले. शेती समृद्धीकरिता काही प्रमाणात आमचाही हातभार लागतो आहे याचे समाधान असल्याची प्रतिक्रिया विद्यार्थ्यांनी यावेळी व्यक्त केली. यंत्राची क्षमता जाणून घेण्यासाठी शेतीत चाचणी या यंत्रांचा प्रयोग दोन एकर शेती परिसरात करण्यात आला. यातून यंत्रांची उपयुक्तता तपासण्यात आली आहे. सदर प्रयोग यशस्वी झाला असून विदर्भ स्तरावरील विविध संशोधनात्मक स्पर्धेत या संशोधनाला प्रथम पारितोषिक प्राप्त झाले आहे. कृषीतज्ज्ञांनी या प्रकल्पाची पाहणी करून शेतीसाठी फायदेशीर असल्याची प्रतिक्रिया दिली आहे. या यंत्राचा वापर केल्यास करंट लागुन होणारी जीवितहानी टाळणे शक्य होणार आहे.
वखरण, कापणी, सिंचन आता होईल एकाच यंत्राने
By admin | Updated: June 22, 2017 00:37 IST