५०० लोकसंख्येसाठी एकच हातपंप : मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतरही समस्या कायमआर्वी : जिल्ह्यात पाणीटंचाईने उग्ररूप धारण केले आहे. टँकरमुक्त जिल्हा असला तरी नागरिकांना तहाणेने व्याकूळ व्हावे लागत असल्याचे चित्र आहे. तालुक्यातील नेरी मिर्झापूर या गावात वर्षभर पाणीटंचाई भासते. परिणामी, नागरिकांमध्ये असंतोष पसरला आहे. ५०० लोकसंख्येच्या गावाला केवळ एकच हातपंप देण्यात आला आहे. यामुळे पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे. मुख्यमंत्र्यांनी भेट दिल्यानंतरही या गावातील समस्या सुटत नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. नेरी मिर्झापूर हे एकमेव पुनर्वसन झालेले गाव आहे. या गावाला आठ महिन्यांपूर्वी मुख्यमंत्र्यांनी भेट दिली. यावेळी ग्रामस्थांनी समस्यांचा पाढा वाचला. मुख्यमंत्र्यांनी समस्या सोडविण्याची ग्वाही दिली; पण अद्यापही त्या जैसे थेच आहे. ५०० लोकवस्तीच्या गावात एकच बोअरवेल असून त्यातही अर्धा तास एक दिवसाआड पाणीपुरवठा होतो. सध्या नेरी मिर्झापूर गावात पाण्याची दुसरी कुठलीही पर्यायी व्यवस्था नहाी. यामुळे भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. गावात पाण्याची टाकी आहे; पण बोअरवेलमधून टाकी भरण्याकरिता दररोज किमान सात ते आठ तास लागतात. परिणामी, नागरिकांना पाणी पुरवठा करता येत नाही. एक दिवसा आड अल्प पाणी मिळत असल्याने नागरिकांना अन्यत्र पाण्यासाठी भटकंती करावी लागते. गावात शाळेच्या बाजूला पाणी पुरवठ्यासाठी टाकी आहे; पण ती जीर्ण झाली आहे. यामुळे कधी कोसळेल याचा नेम राहिला नाही. गावातील सर्व पुनर्वसन कामांना मंजुरी प्राप्त असताना संबंधित विभागाचे अधिकारी वेळकाढू धोरण अवलंबित असल्याने ग्रामस्थांना त्रास सहन करावा लागत आहे. या गावामध्ये एकूण सहा कुपनलिका आहेत; पण यापैकी केवळ एकच कुपनलिका सुरू आहे. गावात पाणी पुरवठा करणारी पाईपलाईन जागोजागी फुटलेली आहे. यामुळे दररोज हजारो लिटर पाणी वाहून जाते. गावातील सांडपाणी या पाईपलाईनमध्ये जात असल्याने ग्रामस्थांना दूषित पाण्याचा पुरवठा होतो. परिणामी, आरोग्याचा प्रश्न गंभीर रूप धारण करीत आहे. जिल्ह्यात सर्वत्र पाणीटंचाईच्या निवारणार्थ उपाययोजना केल्या जात असताना नेरी मिर्झापूर गावाकडे लक्ष देण्यास कुणी तयार नसल्याचे दिसून येत आहे. यामुळे पाणी पेटले, असे म्हणावे लागत आहे. याकडे लक्ष देत कार्यवाही गरजेची आहे.(तालुका प्रतिनिधी)
नेरी मिर्झापूरमध्ये वर्षभर पाणीटंचाई
By admin | Updated: April 29, 2016 02:08 IST