आर्वी : येथील साईनगर परिसरात जीवन प्राधिकरण विभागाच्यावतीने पाणी पुरवठा केल्या जातो. या भागात अनेकांनी अवैधरित्या नळजोडण्या केल्या असून मोटर लावून पाणी ओढले जाते. यामुळे पाणी टंचाई सदृश्य स्थिती आहे. त्यामुळे या भागातील अवैध नळ जोडण्यांचा शोध घेत त्यावर कारवाईची मागणी जीवन प्राधिकरणला निवेदनातून केली आहे. साईनगर येथील काही बांधकामावर प्राधिकरण विभागाच्या पाणीपुरवठा विभागाचे पाईपलाईनवरून अवैध नळकनेक्शन घेतले आहे. नळकनेक्शनला मोटार लावून मोठ्या प्रमाणावर पाणी ओढल्या जात आहे. त्यामुळे या भागातील इतर नागरिकांना पाणीपुरवठा अत्यंत कमी होतो. प्राधिकरणने प्रत्येक नळधारकास एक मिटर देण्याचे नियमात असताना विनामिटर दोन नळकनेक्शन दिल्याचा आरोप होत आहे. या अवैध नळकनेक्शनवर एक हॉर्स पॉवरची मोटर बसवून पाणीओढल्या जाते. याबाबतची माहिती संबंधितांना देऊनही कार्यवाही झाली नसल्याचे निवेदनात म्हटले आहे. अवैध नळजोडण्यांना त्वरित आवर घालत त्यावरील मोटरी बंद कराव्या अशी मागणी विष्णू आहुजा, अशोक भट्टडसह यांनी जीवन प्राधिकरणच्या उपविभागीय अभियंत्यांना निवेदनातून केली आहे.(तालुका प्रतिनिधी)देवळीतही विद्युत मोटारीने पाण्याची बिनदिक्कत चोरीदेवळी- येथील नगर परिषदेच्या नळांवर अनेकांनी वीज मोटारी सुरू केल्या आहेत. यामुळे काही भागातील नागरिकांना पाणी मिळत नाही. नागरिकांना पाण्याकरिता वणवण भटकावे लागत आहे. त्यामुळे नळांवरील मोटारी काढण्याची मागणी पंकज तडस व नागरिकांनी पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.शहरातील काही लोकांनी पालिकेच्या पाईपलाईनवर असलेल्या नळांवर मोटर पंप बसवलेले आहे. त्यामुळे शहरातील अनेक भागात पाण्याचा पुरवठा होत नाही. नळ योजना असून सुद्धा उन्हाळ्यात नागरिकांना दुरवरून हातपंपावरून, विहिरीवरून पाणी आणावे लागत आहे. या बाबत नगरपरिषद कार्यालयात अनेक तक्रारी करण्यात आल्या आहेत. पाणीपुरवठा कर्मचाऱ्याला कोणाच्या घरी मोटरपंप लावले आहे हे माहिती असतानाही कार्यवाही केली जात नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. नळावर मोटारपंप लावणाऱ्यांवर धाडसत्र राबवून पंप लावणाऱ्यांना पाच हजार रुपयांचा दंड करून त्याचा पंप जप्त करण्याची कार्यवाही करण्याची मागणी होत आहे. पाणी पट्टी कर वसूल करताना जी सक्ती करण्यात येते तीच सक्ती पंप काढण्याकरिता करावी, असे निवेदनात नमूद आहे.(प्रतिनिधी)
अवैध नळ जोडण्यांमुळे पाणी टंचाई
By admin | Updated: March 26, 2015 01:44 IST