वर्धा : महाराष्ट्र जीवन प्राधिकरण जल व्यवस्थापनद्वारे पिपरी (मेघे)सह १० गावांना पाणी पुरवठा केला जातो. पिपरी येथील जलकुंभ ते येळाकेळी पुरवठा विहिरीपर्यंतच्या मुख्य पाईप लाईनमध्ये बिघाड आल्याने दुरूस्तीचे काम सुरू आहे. परिणामी, पाणीटंचाई सदृश स्थिती निर्माण झाली आहे. जानेवारी महिन्यात सात ते आठ दिवस पाणीपुरवठा ठप्प होता. नागरिकांना पूर्वसूचनाही दिली जात नसल्याने अनेकांची फजिती होत आहे.शहरालगतच्या ग्रामपंचायतींना पाणीपुरवठा करण्यासाठी जीवन प्राधिकरण जल व्यवस्थापन अंतर्गत योजना साकार झाली. याचा जलकुंभ हनुमान टेकडी पिपरी येथे बांधण्यात आला. येळाकेळी येथील धाम नदी पात्रातील विहीरीतून जलकुंभात पाणी साठविले जाते. ही ५६९ एम.एच. जाडीची ऊर्ध्व नलिका एक किमी अंतरापर्यंत ठिकठिकाणी लीक आहे. यामुळे पाण्याची गळती होते. जलकुंभ पूर्णपणे भरत नसल्याने पुरवठा ठप्प होतो. जलवाहिनीच्या दुरूस्तीसाठी संपूर्ण दिवस लागत असल्याचे संबंधित विभागाचे अभियंते सांगतात. जानेवारी महिन्यात सात ते आठ वेळा पाईपलाईनमध्ये बिघाड आला. यामुळे दुरूस्तीसाठी पुरवठा बंद केला. अनियमित पाणी पुरवठ्याने अकरा गावांतील नागरिकांना समस्यांचा सामना करावा लागला. पाणी पुरवठा बंद असल्याची सूचना दिली जात नसल्याने जादा पाण्याची साठवण केली जात नाही. परिणामी, हिवाळ्यातच पाण्यासाठी भटकंती करावी लागतेय.या मुख्य पाईपलाईनसह अनेक ठिकाणी व्हॉल्व्हमधून पाण्याची गळती होते. परिणामी, पाणी पुरवठ्यावर विपरीत परिणाम होत आहे. या उर्ध्व नलिकेच्या दुरूस्तीसाठी शासनाकडे प्राधिकरणने प्रस्ताव पाठविला आहे. या प्रस्तावाला मंजुरी कधी मिळते, यावरच दुरूस्तीचे काम अवलंबून आहे.(स्थानिक प्रतिनिधी)४पुरवठा विहीर ते जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत उर्ध्व नलिकेच्या माध्यमातून जलकुंभाला पाणी पुरवठा केला जातो. सात किमी अंतराच्या या नलिकेमध्ये बिघाड आला आहे. थंडीमुळे पाईपलाईन आकुंचन पावत असल्याने वारंवार फुटते. यामुळे दुरूस्तीनंतरही पाईपलाईन लीक होत असून ही नलिका बदलणेच गरजेचे झाले आहे. ऊर्ध्व नलिकेच्या दुरूस्तीकरिता वाढीव पाणीपुरवठा योजनेंतर्गत प्रस्ताव पाठविलेला आहे. राज्य शासनाकडून या प्रस्तावाला मंजुरी मिळताच ऊर्ध्व नलिका बदलविण्यात येईल. यानंतर नियमित पाणी पुरवठा होऊ शकेल.- प्रदीप चवडे, शाखा अभियंता, जीवन प्राधिकरण, जलव्यवस्थापन उपविभाग, वर्धा.रोहित्र जळाल्याने पाणी पुरवठा प्रभावितहिंगणघाट : शहरातील पाणी पुरवठ्याचे रोहित्र जळाले होते. ते ३६ तासानंतर दुरूस्त झाल्याने रात्री काही प्रमाणात पाणी पुरवठा झाला. वणा नदीवरील न.प. च्या पाणी पुरवठा यंत्रणेला वीज पुरवठा करणाऱ्या पम्पिंग हाऊसचे २०० केव्हीएचे ट्रान्सफार्मर शनिवारी रात्री १२ वाजता बंद पडले. परिणामी, टाक्या भरल्या नाही. सकाळी न.प. अभियंता तपासे यांनी पाहणी केली; पण नेमका बिघाड लक्षात आला नाही. यामुळे रविवारी शहरात अनेक भागात पिण्याचे पाणी नागरिकांना मिळाले नाही. रोहित्राच्या देखभालीची जबाबदारी पालिकेवर आहे. दुपारी रोहित्र दुरुस्तीचा प्रयत्न झाला; पण यश आले नाही. अखेर नागपूर येथून १६०० रुपये प्रति दिन भाड्याने ५० हजार रुपये अनामत देत रोहित्र आणून सोमवारी दुपारी वीज पुरवठा पूर्ववत सुरू झाला. सदर रोहित्रात कधीही बिघाड संभावित आहे. यामुळे गैरसोय टाळण्यासाठी अतिरिक्त ट्रान्सफार्मरची गरज असून पालिकेने याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.(तालुका प्रतिनिधी)
पिपरीसह १० गावांत पाणी टंचाईची स्थिती
By admin | Updated: January 26, 2016 02:55 IST