झडशी : नजीकच्या अंतरगाव येथील गरीब विधवा शेतकरी महिलेची गत पाच वर्षांपासून महावितरणने थट्टाच चालविली आहे. अनामत रक्कम भरूनही पाच वर्षांपासून सदर महिलेला वीज जोडणीच देण्यात आली नाही़ यामुळे त्यांची शेतीच अडचणीत आली आहे़ कमला कृष्णाजी गोहणे या शेतकरी महिलेचे शेत मौजा अंतरगाव येथे आहे़ त्यांच्या शेतात २००८-०९ मध्ये शासनाकडून जल सिंचन योजनेंतर्गत मिळालेल्या विहिरीचे नवीन बांधकाम करण्यात आले़ यानंतर संबंधित शेतकरी महिलेने वीज जोडणीसाठी महावितरणकडे रितसर अर्ज सादर केला़ नीवन वीज जोडणीसाठी लागणाऱ्या सर्व कागदपत्रांची पुर्तता करून नव्याने अनामत रकमेचा भरणाही केला; पण यास अवघे पाच वर्षे लोटले असताना अद्याप सदर विहिरीवर वीज जोडणी देण्यात आली नाही. शेतकरी महिलेने संबंधित विभागाच्या कर्मचाऱ्यांना विचारणा केली असता तुमचा रेकॉर्ड आमच्या कॉम्प्यूटरला नाही, आम्ही काही करू शकत नाही, असे सांगण्यात येते़ अर्जाची मूळ प्रत, अनामत रक्कम भरल्याची पावती व सर्व कागदपत्र असताना महावितरणचे कर्मचारी त्यांची चेष्टा करीत असल्याचे दिसते़ पाच वर्षांपासून अनामत भरूनही वीज जोडणी न मिळाल्याने शेतकरी महिलेचे मोठे नुकसान झाले़ याकडे लक्ष देत कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे़(वार्ताहर)
पाच वर्षांपासून सिंचन विहिरीला वीज जोडणीची प्रतीक्षा
By admin | Updated: March 27, 2015 01:26 IST