सीईओंना निवेदन : एप्रिलचे वेतन रखडले वर्धा : शालार्थ वेतन प्रणालीतील घोळ शिवाय संबंधितांच्या संकल्पना स्पष्ट नसणे आणि कार्यालयीन दफ्तर दिरंगाईमुळे जि. प.च्या २७00 शिक्षकांचे एप्रिल महिन्याचे वेतन मे महिना संपायला आला तरी मिळाले नाही. याबाबत तत्काळ कार्यवाही करण्याची मागणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीने निवेदनाद्वारे जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी उदय चौधरी यांना केली. एप्रिल देय मे महिन्याचे शिक्षकांचे वेतन शालार्थ प्रणालीने ऑनलाईन करण्याचे आदेश राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने दिले होते; मात्र जिल्हा परिषदेतील शिक्षकांचे वेतन करण्याच्या प्रचलित कार्यप्रणालीसोबत सध्याचा शालार्थ प्रणालीचा मेळ जुळत नाही. शालार्थ प्रणाली विकसीत करणारे साफ्टवेअर परिपूर्ण तयार नाही. शिवाय जि.प.व पं.स.मध्ये काम पाहणार्या संबंधीत कर्मचार्यांच्या संकल्पना स्पष्ट नसणे व काम जलदगतीने पूर्ण करण्याच्या उदासिनतेमुळे मे महिना संपत असताना सुद्धा एप्रिल महिन्याचेच वेतन नाही. मे महिन्याच्या वेतन देयकास तर उद्याप हातही लागला नसल्याचा आरोप प्राथमिक शिक्षक समितीने निवदेनातून केला आहे. वेतन नसल्याने पाल्यांचे गणवेश व शालापयोगी साहित्य, प्रवेश शुल्क, कर्ज परतावा हप्ते, जीवन विमा हप्त्यांकरिता शिक्षकांची ओढताण होत आहे. याकडे लक्ष देत वेतनाचा मार्ग काढण्यची मागणी प्राथमिक शिक्षक समितीच्या पदाधिकार्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी उदय चौधरी, शिक्षणाधिकारी धनराज तेलंग यांना केली आहे. शालार्थ प्रणालीतील त्रुटी दूर होईपर्यंत जुन्या प्रचलित पद्धतीने प्राथमिक शिक्षकांचे वेतन देण्याचे आदेश संबंधितांनी देण्याची मागणी राज्याचे शिक्षण आयुक्त एस. चौक्कलिंगम, शिक्षण संचालक महावीर माने यांच्याकडे समितीच्यावतीने करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)
शालार्थ वेतन प्रणालीचा घोळ
By admin | Updated: May 27, 2014 23:54 IST