भारत निवडणूक आयोगाचा निर्णय : चारही मतदार संघांत कार्यक्रमास प्रारंभवर्धा : भारत निवडणूक आयोगाद्वारे मतदार याद्यांचे शुद्धीकरण आणि प्रमाणिकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी तत्सम कार्यक्रम राबविला जात आहे. चारही विधानसभा मतदार संघामध्ये १ एप्रिलपासून संबंधित अधिकारी, कर्मचाऱ्यांद्वारे हे काम सुरू करण्यात आल्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी आशुतोष सलील यांनी सांगितले.राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी व भारत निवडणूक आयोग यांनी संंपूर्ण देशात प्रत्येक महिन्याचे एका रविवारी विशेष मोहीम आयोजित करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार जून महिन्यात २१ जूनऐवजी २८ जून रोजी व जुलै महिन्यात १२ जुलै या दिवशी प्रत्येक मतदार संघात विशेष मोहिमेचे आयोजन करण्यात येणार आहे. विशेष मोहिमेच्या दिवशी बुथ लेव्हल अधिकारी संबंधित मतदार केंद्रांवर उपस्थित राहून आधार कार्ड, ई-मेल, मोबाईल क्रमांक संकलीत करून सॉफ्टवेअरमध्ये अपडेट करणार आहेत. मतदारांची छायाचित्रे, मतदार ओळखपत्रातील माहिती व युआयडीएआयची आधार कार्डमधील माहिती यांची सांगड घालणे, मतदार यादीतील दुबार, मयत व स्थलांतरीत मतदारांची नावे मतदार यादीतून वगळणे, मतदार छायाचित्र ओळखपत्रातील चुका दुरूस्त करून प्रमाणित मतदार याद्या तयार करणे, हा मतदार याद्या शुद्धीकरण व प्रमाणिकरण कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे. जिल्ह्यातील आर्वी, देवळी, हिंगणघाट आणि वर्धा या चारही विधानसभा मतदारसंघात १ एप्रिलपासून या कार्यक्रमास प्रारंभ झाला आहे. राष्ट्रीय मतदार याद्या शुद्धीकरण, प्रमाणिकरण कार्यक्रमात १ एप्रिल ते दिनांक ८ जूनपर्यंत चारही मतदार संघामध्ये झालेल्या कामांची माहितीही प्रपत्रात सादर करण्यात आली आहे. यामुळे आता मतदार याद्या अद्यावत होतील, असे संकेत मिळू लागले आहेत.(कार्यालय प्रतिनिधी)
मतदार याद्यांचे होणार शुद्धीकरण आणि प्रमाणीकरण
By admin | Updated: June 22, 2015 01:54 IST