आष्टी (श.) : जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत गुरूवारी मतदारांनी उत्साहाच्या वातावरणात मतदान केले. दुपारी ३.३० वाजेपर्यंत तालुक्यात ४५ टक्के मतदान झाले होते. मोई गावात मतदारांनी बहिष्कार टाकल्याने सर्वच धावपळ झाली. प्रशासनाने समजविल्यानंतरही ग्रामस्थ मतदान करायला तयार झाले नाही. यामुळे शून्य टक्के मतदान झाले.जिल्हा परिषदकरिता तीन गट आणि पंचायत समितीचे ६ गण, अशा एकूण नऊ जागांकरिता मतदान झाले. यात एकूण ३२ उमेदवार रिंगणात होते. मतदानासाठी ६८ मतदान केंद्र तयार करण्यात आले होते. ३५० कर्मचारी, ६ झोनल अधिकारी यात कार्यरत होते. उपजिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी स्वप्नील तांगडे, तहसीलदार सीमा गजभीये, नायब तहसीलदार मृदूला मोरे, गणेश सोनवणे, थोरात यांच्या पथकाने सर्वत्र भेट देत पाहणी केली. सर्वत्र उत्साहाने मतदान झाले. काही ठिकाणी मतदार यादीत नाव नसल्याने उमेदवारांची तारांबळ उडाली; पण प्रसिद्ध झालेल्या याद्या व मतदान केंद्रावर आलेल्या मतदारांच्या नावात तफावत होती. यामुळे काही जण वंचित राहिले. साहूर सर्कलमध्ये वातावरण तापले होते. सर्वत्र दारूचा पुरवठा व पार्ट्यांचा सुकाळ होता. लहानआर्वी व तळेगाव सर्कलमध्येही मोठ्या प्रमाणात दारूचे वाटप झाल्याची माहिती देण्यात आली.(तालुका प्रतिनिधी)
मतदारांचे उत्साहपूर्ण वातावरणात मतदान
By admin | Updated: February 17, 2017 02:10 IST