समुद्रपूर : गावातील आठवडी बाजार त्या गावाकरिता महत्त्वाचा असतो. हा बाजार प्रत्येक गावात भरतो. तिथे सुविधा पुरविण्याची जबाबदारी त्या गावाच्या ग्रामपंचायतीची आहे. मात्र तालुक्यातील नंदोरी येथील आठवडी बाजारात मुलभूत सोयींचा बोजवारा निघाला. याचा त्रास बाजारात येत असलेल्या नागरिकांना सहन करावा लागत आहे. यामुळे येथे सुविधा पुरविण्याची मागणी प्रहार संघटनेच्यावतीने सरपंचाला निवेदनाद्वारे केली आहे. आठवड्यातून एक दिवस भरणाऱ्या या बाजारात परिसरातील व्यवसायी येत असतात. त्यांना त्यांची दुकाने थाटण्योकरिता बाजार भरणाऱ्या परिसरात ओटे बांधण्याची गरज असते. येथे बांधण्यात आलेले ओटे अपुरे पडत असल्याने येथे येणारे व्यवसायी रस्त्यावर दुकाने थाटत असतात. यामुळे वाहतुकीची समस्या निर्माण होत आहे. शिवाय बांधण्यात आलेल्या ओट्यांवर अनेकांनी अतिक्रमण केले असून त्याचा वयक्तीक वापर होत आहे. याकडे लक्ष देण्याची मागणीही या निवेदनात करण्यात आली आहे. ग्रामपंचायत प्रशासनाने नवीन ओट्यांची निर्मिती करावी. ओट्यांवरील अतिक्रमण त्वरीत काढून विविध व्यावसायिकांना दुकानासाठी जागा उपलब्ध करून द्यावी, बाजारातील स्वच्छतेसाठी आवश्यक उपाय योजना कराव्या अशी मागणी आहे. निवेदन देताना संघटनेचे समुद्रपूर तालुका प्रमुख देवा धोटे, नंदोरीचे ग्रामपंचायत सदस्य खेमलाल जगराह, अमित धुमाळ, सचिन हिवरकर, रोहन माकोडे, चेतन छापेकर, सुधाकर सुरकार, प्रवीण जापणे, नारायण लेंडे, प्रवीण बोरूटकर, प्रशांत पोफारे, रंजीत रक्षीये, सचिन माजूरकर यांची उपस्थिती होती.(शहर प्रतिनिधी) बाजारातील ओट्यांवर गावकऱ्यांचे अतिक्रमण आठवडी बाजारात व्यावसायिकांना त्यांचे दुकान लावता यावे याकरिता ओटे बांधण्यात आले. या ओट्यांवर गावातील काही नागरिकांनी अतिक्रमण केले आहे. यामुळे बाजाराच्या दिवशी येथे गर्दी होते. बाहेर गावातून येणाऱ्या दुकानदारांना त्यांची दुकाने रस्त्यावर लावावी लागतात. यामुळे येथे वाहतुकीची समस्या निर्माण होते. याकडे ग्रामपंचायत प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी करण्यात आली आहे.
आठवडी बाजारातील असुविधांमुळे गावकरी त्रस्त
By admin | Updated: February 26, 2015 01:14 IST